प्रवासाच्या बहाण्याने एसटीत बसायच्या अन् हे करायच्या...

Image may contain: one or more people and outdoorरांजणगाव गणपती, ता. 21 डिसेंबर 2019: प्रवासाच्या बहाण्याने एसटीत बसायचे. लहान मूल अगर अधिक साहित्य असलेल्या महिलेला हेरायचे. तिच्याशी लगट करायची. प्रसंगी झटापटी करून तिच्याकडील पिशवीतून अगर पर्समधून बेमालूमपणे ऐवज हस्तगत करायचा, असा प्रकार शिरूर तालुक्यात अनेकदा होत होता. रांजणगाव पोलिसांनी अटक केली आहे.

शैलजा रवी काडमंचल (वय 30), यल्लव्वा व्यंकटेश काडमंचल (वय 30), संतोषी व्यंकटेश काडमंचल (वय 25), अर्चना बालाजी काडमंचल (वय 28), गायत्री विष्णू काडमंचल (वय 23) व दीपा रवी काडमंचल (वय 20, सर्व रा. कासिवल मारवेल, औरंगाबाद), अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. शिरूर न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी दिली आहे.

याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, रांजणगाव गणपती येथील प्रतिभा दिनेश बत्ते या आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह बुधवारी (ता. 18) दुपारी तीनच्या सुमारास भावाच्या साखरपुड्यासाठी सुपे येथे जाण्यासाठी एसटीत (क्र. एमएच 20 बीएल 1899) बसल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्यापाठोपाठ पाच-सहा महिला घाईघाईने एसटीत चढल्या. बसायला जागा असूनही त्या प्रतिभा यांच्याभोवतीच घुटमळत होत्या. त्यामुळे वाहकाने त्यांना दरडावले. परंतु, त्यांनी दुर्लक्ष केले. तसेच, प्रतिभा या मोकळ्या सीटवर बसण्यासाठी जाऊ लागताच त्यांनी बाचाबाची व ढकलाढकली केली. त्यादरम्यान प्रतिभा यांच्या हातातील पर्स हिसकवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.


दरम्यान, तिकीट काढण्यासाठी प्रतिभा यांनी पर्स उघडताच त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने असलेली डबी पर्समध्ये नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा करताच संबंधित महिलांनीही आरडाओरडा करून बस न्हावरे फाटा येथे थांबविण्यास भाग पाडली व घाईघाईने उतरून त्या पुण्याकडे जाणाऱ्या एसटीमध्ये बसल्या. प्रतिभा यांनी त्या एसटीचा क्रमांक घेऊन तो आपल्या नातेवाईकांना व रांजणगाव पोलिसांना कळविला.

पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी अनिल चव्हाण, तुषार पंदारे, नानासाहेब काळे, चंद्रकांत काळे, प्रफुल्ल भगत, ज्ञानेश्‍वर शिंदे, मिलिंद देवरे, राजू वाघमोडे, मोनिका वाघमारे, शुभांगी पवार, अर्चना यादव, रेखा टोपे व किरण गोरडे या पोलिस पथकासह एसटीचा पाठलाग केला. दरम्यान, शिक्रापूर येथे ही एसटी थांबली तेव्हा त्या महिला घाईघाईने उतरून पळून जाऊ लागल्या. मात्र, पोलिस पथकाने त्यांना चोहोबाजूने घेरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील सामानाची झडती घेतली. त्यावेळी प्रतिभा यांचे चोरीला गेलेले सुमारे तीन लाख 18 हजार पाचशे रूपये किमतीचे नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने त्यांच्याकडे सापडले.

दरम्यान, या टोळीकडून अशा प्रकारचे इतरही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. त्यांचा इतर गुन्ह्यांतील सहभाग तपासून पाहिला जात आहे. ऐवज चोरीला जाऊनही तक्रार न दिलेल्या घटकांनीही पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन रांजणगाव पोलिसांनी केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या