पुणे-नगर मार्गावर असा असणार पर्यायी रस्ता...

शिरूर, ता. 22 डिसेंबर 2019: पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीवर ताण येऊ नये म्हणून वाहतूक 31 डिसेंबर 2019 रोजी मध्यरात्री बारापासून 1 जानेवारी 2020 रोजी मध्यरात्री बारापर्यंत अन्य मार्गांनी वळविण्याचे नियोजन केले आहे.

1 जानेवारीला अभिवादन दिनानिमित्त पुणे-नगर महामार्गावर सुमारे दहा ते बारा लाख लोक येतील, असे गृहीत धरून दहा दिवस आधीच वाहतुकीच्या मार्गांवरील बदल जाहीर केले आहेत. 31 डिसेंबर 2019 रोजी रात्री बारापासून 1 जानेवारी 2020 रोजी रात्री बारापर्यंतच्या या बदलांबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शिक्रापूर पोलिसांसह सर्व प्रशासकीय विभागांना पत्रकाद्वारे कळविले आहे.


पेरणे फाटा (ता. हवेली) येथे विजयस्तंभ अभिवादन दिनानिमित्त दरवर्षी राज्यभरातून मोठ्या संख्येने जनसमुदाय एकत्रित येतो. या दिवशी पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीवर ताण येऊ नये म्हणून वाहतूक 31 डिसेंबर 2019 रोजी मध्यरात्री बारापासून 1 जानेवारी 2020 रोजी मध्यरात्री बारापर्यंत अन्य मार्गांनी वळविण्याचे नियोजन केले आहे. सोलापूर, पुणे, मुंबई; तसेच पुणे-नगर महामार्गावरून नगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी; तसेच नगरहून शिक्रापूरमार्गे पुण्याकडे येणाऱ्या सर्व वाहनांसाठी एका दिवसापुरता वाहतूक मार्गात बदल केला आहे. तो पुढीलप्रमाणे ः

1. नगरकडून येणारी सर्व जड वाहने शिक्रापूर येथील चाकण चौकातून चाकणच्या दिशेने वळतील.
2. पुण्याहून नगरच्या दिशेने जाणारी सर्व व्यावसायिक, खासगी, प्रवासी वाहतूक करणारी जड वाहने येरवडा- विश्रांतवाडी-आळंदी-चाकणमार्गे शिक्रापूर-नगर रोड अशी नगरच्या दिशेने जातील.
3. पुण्याहून नगरकडे जाण्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे येरवडा-खराडी बायपासमार्गे हडपसर-पुणे-सोलापूर रस्ता-केडगाव- चौफुला- न्हावरे-शिरूर या मार्गाने पुढे नगर.
4. सोलापूर महामार्गावरून पुणे-नगर रस्त्याच्या दिशेने लोणीकंदकडे येणारी सर्व वाहने हडपसर-मगरपट्टा- खराडी-बायपासमार्गे येरवडा- विश्रांतवाडी-आळंदी- चाकणमार्गे पुन्हा शिक्रापूरकडून नगरच्या दिशेने जातील.
5. आळंदीकडून पुणे-नगर महामार्गाकडे जाऊ इच्छिणारी सर्व वाहने मरकळ-शेलपिंपळगाव ते शिक्रापूर अशा मार्गाने पुढे नगरकडे जातील.
6. आळंदीकडून सोलापूर रस्त्याकडे जाणारी सर्व वाहने विश्रांतवाडी-येरवडा-खराडी बायपास ते हडपसरमार्गे सोलापूरकडे जातील.

दरम्यान, अभिवादन दिन कार्यक्रमामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून वरील पर्याय काढले असून 1 जानेवारी रोजी प्रवास करणाऱ्या सर्व वाहनधारकांना, वाहतूकधारकांना पर्याय समजावेत म्हणून दहा दिवस आधीच बदल जाहीर केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाचे वतीने पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार व सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या