महिलेच्या डोक्यावर तब्बल ३१ वर्षांपासून होती जट पण...

Image may contain: 4 people, people smiling, people standing and indoorशिक्रापूर, ता.२२ डिसेंबर २०१९ (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील महादेववाडी येथे एका महिलेने अंधश्रद्धेच्या भीतीने डोक्यावर तब्बल ३१ वर्षांपासून ठेवलेली जट अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी काढून टाकत महिलेची जेटेतून मुक्तता करत चक्क गुरु शिष्याची परंपरा मोडून काढली. १४६ व्या महिलेची जटेतून मुक्तता केली असल्याचे अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

केंदूर (ता. शिरुर) येथील महादेववाडी येथे भामाबाई साकोरे या महिलेच्या डोक्यावर तब्बल ३१ वर्षांपासून जट होती. दरम्यानच्या काळामध्ये साकोरे या महिलेने अंधश्रद्धेच्या प्रकारातून अनेक महिला शिष्या बनविल्या आणि त्यांच्या त्या गुरु झालेल्या होत्या. परंतु, काही दिवसांपूर्वी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी साकोरे यांनी बनविलेल्या एका शिष्य महिलेच्या डोक्यावरील जट काढून त्यांचे अंधश्रद्धेतून निर्मुलन करत समुपदेशन केले होते. त्यांनतर काही दिवसांनी सदर महिलेने भामाबाई साकोरे यांना जट काढल्यानंतर काहीही त्रास होत नसून, जटेचा प्रकार हा अंधश्रद्धा असल्याचे सांगितले. त्यांनतर साकोरे यांनी देखील त्यांना जटेमुळे होत असलेल्या त्रासातून मुक्ती मिळविण्यासाठी सदर शिष्य महिलेला मला देखील जट काढायची आहे असे सांगितले.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांना माहिती देण्यात आली. दरम्यान अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव, पुणे जिल्हा महिला कार्यवाह डॉ.पार्वती कदम, शिरुरच्या माजी सभापती आरती भुजबळ यांनी महादेववाडी येथे जात सदर महिलेच्या शिष्य असलेल्या महिलेच्या माध्यमातून भामाबाई साकोरे यांचे अंधश्रद्धेतून निर्मुलन करत समुपदेशन करून त्यांना माहिती दिली. तसेच जट हा एक प्रकारे अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे सांगत जट काढून टाकल्याने काहीही त्रास होणार नाही असे समजावून सांगितले.त्यांनतर लगेचच भामाबाई साकोरे यांनी डोक्यावर तब्बल ३१ वर्षांपासून ठेवलेली जट काढण्यास परवानगी दिली.


यावेळी नंदिनी जाधव यांनी साकोरे यांच्या डोक्यावरील जट काढून टाकली. त्यावेळी बोलताना डोक्यावरील जट काढल्यामुळे खूप बरे वाटत असल्याचे देखील साकोरे यांनी सांगितले. यावेळी बोलताना शिष्यांच्या मदतीने गुरूने जट काढून टाकली असा प्रकार आज पहिल्यांदाच घडला असून, या पुढील काळामध्ये अनेक महिला यामुळे जटेतून मुक्ती मिळवतील असे अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी सांगितले.

महिलांनी व नागरिकांनी संपर्क साधावा: नंदिनी जाधव
कोठेही महिलांच्या डोक्यावर जट असल्यास त्यांनी अंधश्रद्धा न बाळगता जट काढण्यासाठी प्रयत्न करावे तसेच नागरिकांनी कोठे याबाबत माहिती मिळाल्यास अथवा गावामध्ये, परिसरात कोणाच्या डोक्यावर जट असेल तर ९४२२३०५९२९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या