५८४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; १०७ जणांना...

कोरेगाव भीमा, ता. 24 डिसेंबर 2019 : पेरणेफाटा येथे एक जानेवारीला विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाच्या काळात कोणताही अनुचीत प्रकार घडू न देता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शिक्रापूर व लोणीकंद पोलिस ठाणे हद्दीतील १०७ जणांना या परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तर ५८४ जनांवर ३० डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.

पेरणे फाटा येथील विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या लाखो समाज बांधवाची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रतिबंधात्मक कारवाईबाबतही पुणे ग्रामीण पोलिस दल दक्ष आहे. या पार्श्वभूमीवर शिक्रापुर पोलिस ठाण्याचे निरिक्षक सदाशिव शेलार व लोणीकंद पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रताप मानकर यांनी प्रतिबंधात्मक कारवाईबाबत माहिती दिली.

या काळात सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरविणे, जातीय भावना दुखावणे यासह विविध गुन्हयावर कडक कारवाईचे संकेत व मानकर यांनी दिले. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सीआरपीसी कलम १०७ प्रमाणे ७१ जणांवर प्रवेश बंदी, कलम ११० नुसार ५ , तर १४४/२ नुसार ३० व १४९ नुसार २५० जणांसह शिक्रापुर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील ३५५ जणांवर  तर लोणीकंद पोलिस ठाण्याअंतर्गत  कलम १०७ नुसार ३६ जणांवर प्रवेश बंदी, कलम ११० नुसार १५ जणांवर, १४४/२ नुसार ७५ जणांवर तर कलम १४९ नुसार १०३ जणांसह एकूण २२९ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान, या काळात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस अधीक्षक संदिप पाटिल यांनी केले आहे. सोशल मिडियातील चुकीच्या पोस्ट व अफवा वर विश्वास ठेऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.


गावांमध्ये फ्लेक्‍सबंदी...

शिक्रापूर व लोणीकंद पोलिस ठाण्यांमधील सर्व गावांमध्ये फ्लेक्‍सबंदी केली आहे. 1 तारखेच्या अभिवादन दिनासाठीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. 31 डिसेंबर 2016च्या रात्री एका फ्लेक्‍सवरून दोन समाजात निर्माण झालेली तेढ, दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी 2017 रोजी कोरेगाव भीमा सणसवाडीत झालेली दंगल, त्याचे लोण राज्यभर पसरल्याचे वास्तव आणि त्यापुढील काळात पुणे जिल्हा प्रशासनासाठी मोठ्या आक्षेपांना सामोरे जावे लागण्याच्या प्रसंगाने जिल्हा प्रशासनाने मागील वर्षापासून सर्व स्तरावर दक्षता घेतली आहे.

यावर्षी दहा दिवस आधीच पुणे-नगर वाहतूक नियोजनाची माहिती राज्यभर कळवितानाच आता शिक्रापूर-लोणीकंद पोलिस ठाणे हद्दीत कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्‍स लावता येणार नाहीत, असे ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे. याबाबत स्थानिक ग्रामपंचायतींकडे लक्ष ठेवण्याची व तशी माहिती तातडीने कळविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 2 जानेवारी 2020 पर्यंत हद्दीतील कुठल्याही गावात कुठले फलक लावले गेले आणि गाव-परिसरात त्याचे काही पडसाद उमटले तर गंभीर गुन्हाही दाखल करण्याच्या तयारीत जिल्हा पोलिस आहेत.

सुमारे साडेतीन हजारांहून जास्त पोलिस शिक्रापूर ते लोणीकंद या दोन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीत बंदोबस्ताला उतरणार आहेत. त्यांच्याकडील सर्व बंदुकांची हवेत गोळीबार करून तपासणीही केली आहे, अशी माहिती शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या