महावितरणचे ध्येय ग्राहक समाधानाचे...

महावितरणकडून राज्यातील ४५७ शहरे व ४१९२८ खेडेगावांतील सुमारे २ कोटी ६५ लाख वीजग्राहकांच्या ग्राहकसेवेसाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. मुख्यत्वे म्हणजे ऑनलाईन द्वारे विविध सेवा उपलब्ध असल्याने वीजग्राहकांना विविध कामांसाठी आता महावितरणच्या कार्यालयांमध्ये जाण्याची आवश्यकताच उरलेली नाही.वीजबिल भरणा,नवीन वीजजोडणी,नावात बदल,वीजबिलांबाबत तक्रारी आदींसह विविध कामे ऑनलाईन द्वारे करता येत आहे. वीजग्राहकांच्या आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत महावितरणच्या ग्राहकसेवा पुढीलप्रमाणे.

१) लघुदाब ग्राहकांसाठी ऑनलाईन पेमेंटची सोय :- महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी "ऑनलाईन" बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in या वेबसाईटद्वारे सोय उपलब्ध करून दिली होती.त्यानंतर जून २०१६ मध्ये वीजग्राहकांसाठी मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली.या अ‍ॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग,क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्‌सचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे.ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे.

"ऑनलाईन" बिल भरणा झाले निःशुल्क :- क्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीजबिल भरण्यासाठी "ऑनलाईन" चे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क करण्यात आले आहे.याआधी नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा "ऑनलाईन" भरणा करण्यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते.परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅश कार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून 'ऑनलाईन'द्वारे होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क करण्यात आलेला आहे.

"ऑनलाईन" बिल भरल्यास ०.२५ टक्के सूट :- लघुदाब वीजग्राहकांसाठी 'ऑनलाईन' बिल भरण्यासाठी दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे.क्रेडीट कार्ड,डेबीट कार्ड,युपीआय,भीम,इंटरनेट बॅकींग,मोबाईल वॉलेट,मोबाईल बॅकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये ०.२५  टक्के सूट देण्यात येत आहे.ही सूट मिळविण्यासाठी संबंधीत ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी नसावी तसेच वीजबिलांचा भरणा हा प्रॉम्ट पेमेंट डिस्काऊंटच्या निर्धारित वेळेत करणे आवश्यक आहे.

२) मोबाईल अ‍ॅप :- महावितरणने वीजग्राहकांसाठी तयार केलेले मोबाईल अ‍ॅप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून "अ‍ॅन्ड्राईड","विन्डोज" व "आयओएस" ऑपरेटींग सिस्टीमच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप डाऊनलोड होईल अशी सुविधा आहे.महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटसह गुगल "प्ले-स्टोअर" अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरमधून हे अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सोय आहे.

वीजग्राहकांसाठी असलेल्या मोबाईल अ‍ॅपमधून उच्च व लघुदाब (एलटी व एचटी) वीजजोडणीची मागणी करता येते.चालू व मागील देयके पाहणे आणि त्याचा भरणा करण्यासाठी नेटबॅकींग,क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्‌सचा पर्याय आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही उपलब्ध आहे. वीजसेवेबाबत टोल फ्री क्रमांकावर संपर्काची व तक्रारी करण्याची सोय आहे.ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीज जोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे.सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांना इतर सेवांसाठी मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीची नोंदणी किंवा ते अद्यायावत करण्याची सोय आहे.यासह महावितरणच्या सेवेबाबत वीजग्राहकांना फिडबॅक देण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

३) नवीन वीजजोडणीसाठी "ऑनलाईन" पर्याय :- कृषी,घरगुती,औद्योगिक,वाणिज्यिक अशा सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना आता नवीन वीजजोडणीच्या अर्जासाठी मोबाईल अ‍ॅप किंवा www.mahadiscom.in या वेबसाईटद्वारे "ऑनलाईन" सोय उपलब्ध झाली आहे.ऑनलाईन अर्ज करणार्‍या ग्राहकांना संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल पत्ता देणे बंधनकारक आहे.कंपनीचे कॉलसेंटर या ऑनलाईन अर्जदार ग्राहकाशी संपर्क साधून त्यांनी दिलेल्या माहितीची खात्री करून घेईल आणि संबंधीत कार्यालयाकडे हा तपशील पाठवतात.त्यानंतर शहरी भागात ७ दिवसांत व ग्रामीण भागात १० दिवसांत संबंधित  उपविभागीय कार्यालयाचे कर्मचारी ग्राहकाशी संपर्क साधतात.वीजजोडणीच्या जागेची पाहणी करून नवीन जोडणीच्या ए-१ फॉर्मवर संबंधीत ग्राहकाची सही व संबंधीत कागदपत्रे घेतली जाते व त्यानंतर संबंधीत उपविभागीय कार्यालयाकडून नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही सुरु होते.

४) २४ x ७ टोल फ्री कॉल सेंटर :- शहरी व ग्रामीण क्षेत्रातील वीजग्राहकांसाठी २४ x ७ सुरु असणारे टोल फ्री कॉल सेंटर कार्यरत आहे. वीजसेवेबाबत कोणतीही तक्रार करण्यासाठी दूरध्वनी व मोबाईलधारक वीजग्राहकांसाठी १९१२ किंवा १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारीसह सर्व प्रकारच्या तक्रारी या टोल फ्री क्रमांकावर दाखल करू शकतात.तक्रारदार ग्राहकांना तक्रार क्रमांक देण्यात येतो तसेच तक्रारीचे निवारण करण्याची कार्यवाही लगेचच सुरु होते.

५) "एस एम एस " द्वारे वीजबीलाची व इतर माहिती :- वीजग्राहकांना मराठी व इंग्रजी भाषेतून "एस एम एस" द्वारे माहिती उपलब्ध करून देण्यात येते.यामध्ये पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद राहणार असल्याचा कालावधी,नैसर्गिक आपत्ती,तांत्रिक बिघाड किंवा विविध कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची व वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा संभाव्य कालावधी,दरमहा वीजबिलाची रक्कम,देय दिनांक आदींचा तपशील,मीटर रिडींग घेण्याची तारीख व कालावधी, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व एकूण युनिटचा वापर,वीजबिलाची मुदत उलटून गेल्यास त्यासंबंधीची माहिती,वीजपुरवठा खंडित करण्याची नियमाप्रमाणे नोटीस आदींची माहिती निशुल्क देण्यात येते.

वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून ९२२५५९२२५५ क्रमांकावर MREG (स्पेस) (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून "एस एम एस" केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय टोल फ्री काॅल सेंटर  www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अ‍ॅपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.

६) गो-ग्रीनमध्ये ई-बीलाचा पर्याय :- छापील कागदाऐवजी "ई-मेल" चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना १ डिसेंबर २०१८ पासून प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे.पर्यावरणपुरक या योजनेमुळे वीजग्राहकांच्या वार्षिक १२० रुपयांची बचत होणार आहे.याशिवाय वीजबिल दरमहा "ई-मेल" तसेच "एस एम एस" द्वारे मिळणार असल्याने ते लगेचच ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे.ज्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त बिल किंवा महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर असलेले वीजबिल डाऊनलोड व प्रिंट करण्याची सोय आहे.विशेष म्हणजे ही वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत व ते रंगीत स्वरुपात देखील प्रिंट केले जाऊ शकते. "गो-ग्रीन" चा पर्याय निवडण्यासाठी मोबाईल अ‍ॅप,महावितरणचे संकेतस्थळावर किंवा https://billing.mahadiscom.in/gogreen.php या लिंकवर उपलब्थ आहे.

७) ईमेलद्वारे ई-बील उपलब्ध :- महावितरणकडून लघुदाब वीजग्राहकांना त्यांच्या इमेलवर संबंधीत वीजबील दरमहा उपलब्ध करून देण्यात येत आहे.छापील कागदाच्या देयकासह दरमहा इमेलद्वारे वीजदेयके मिळविण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर किंवा महावितरणच्या http://wss.mahadiscom.in/wss/wss या वेब सेल्फ सर्व्हीसच्या पेजवर जाऊन वीजग्राहकांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल.त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ई-बील ऑप्शनमध्ये लघुदाब वीजग्राहकांनी ग्राहक क्रमांक,प्रोसेसींग सायकल,बिलींग युनिट आणि ई-बील प्राप्त करण्यासाठी इमेल अ‍ॅड्रेस याची माहिती भरल्यानंतर ई-बील उपलब्ध करून देण्यात येत आहे.

८) वीजग्राहकांसाठी विशेष मदत कक्ष :- महावितरणच्या ग्राहकांना नवीन वीजजोडणी तसेच ग्राहक नावात बदल करण्याच्या प्रक्रियेत तक्रार असल्यास ती तातडीने सोडविली जावी यासाठी महावितरणच्या मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात विशेष मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे.नवीन वीजग्राहकांना वीजजोडणी घेताना आणि ग्राहक नावात बदल करताना विविध कारणांमुळे अडचणी आल्यास किंवा काही तक्रार असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी हा विशेष मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षाला संपर्क साधण्यासाठी ०२२-२६४७८९८९ आणि ०२२-२६४७८८९९ हे दोन दूरध्वनी क्रमांक कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत.

९) उच्चदाब ग्राहकांसाठी कन्झुमर पोर्टल :- उच्चदाब ग्राहकांना वीजबिलांची माहिती,ऑनलाईनद्वारे वीजबिलांचा भरणा,वीजवापराचा सविस्तर तपशील तसेच वीजबिल किंवा इतर तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणने उच्चदाब ग्राहकांसाठी "उच्चदाब ग्राहक पोर्टल" (एचटी कन्झुमर पोर्टल) सुरू केलेले आहे. या पोर्टलद्वारे उच्चदाब ग्राहकांना मोबाईल क्रमांक,ई-मेल व इतर तत्सम माहिती अद्ययावत करता येईल.तसेच प्रतितास,प्रतिदिवस तसेच मासिक वीज वापराची माहिती आदी सुविधा उपलब्ध आहेत."बील सिमुलेशन मेनू" आणि "कम्पॅरिझन विथ पीअर्स" हे दोन मेनू उच्चदाब ग्राहकांच्या दृष्टीने महत्वाचे आहेत.यात "बील सिमुलेशन मेनू" द्वारे उच्चदाब ग्राहकांना स्वत:च्या वीज वापराच्या अंदाजपत्रक तयार करता येऊ शकते.त्यामुळे वीज वापराचा व त्या अनुषंगाने वीजबिलाचा पूर्वानुमान काढून तसे नियोजन करता येते.तसेच "कम्पॅरिझन विथ पीअर्स" या मेनूद्वारे उच्चदाब ग्राहकांना उद्योगाशी संबंधित अन्य उद्योगांमधील वीज वापराची व स्वत:च्या वीज वापराची तुलना करता येते.हे पोर्टल महावितरणच्या www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

          लेखक:-निशिकांत राऊत,
(जनसंपर्क अधिकारी) महावितरण,बारामती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या