अशोक पवार यांचे कारखान्याचे संचालकपद रद्द पण...

Image may contain: 1 person, smilingशिरूर, ता. 30 डिसेंबर 2019: न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची जागा खासगी शैक्षणिक ट्रस्टला दिल्याप्रकरणी योग्य खुलासा न करता आल्याने कारखान्याचे अध्यक्ष आमदार ऍड. अशोक पवार यांना संचालकपदावरून दूर करण्याचा आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिला. तसेच, कारखान्याची पुढील निवडणूक लढविण्यासही अपात्र ठरविले आहे. पण, पवार हे उच्च न्यायालयामध्ये गेले असून, निकालाला स्थगिती दिली आहे.

घोडगंगा कारखान्याच्या मालकीची न्हावरे येथील सुमारे दोन कोटी 34 लाख रुपये किमतीची सुमारे पाच एकर जमीन "रावसाहेब पवार शैक्षणिक फाउंडेशन' या ट्रस्टला विनामोबदला 99 वर्षांच्या कराराने देण्यात आली होती. अशोक पवार हेच या शैक्षणिक संस्थेचे तहहयात अध्यक्ष आहेत. दरम्यान, याविरोधात कारखान्याचे सभासद संजय दत्तात्रेय बेंद्रे (रा. आंबळे, ता. शिरूर) यांनी 12 जुलै रोजी पुणे विभागाच्या प्रादेशिक सहसंचालकांकडे तक्रार केली होती.

अधिकाराचा हा गैरवापर असल्याचे तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीची दखल घेऊन संबंधित प्रकरणाचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याबाबत सहसंचालक कार्यालयाने विशेष लेखापरीक्षकांना कळविले होते. त्यांनी 20 ऑगस्टला सादर केलेल्या अहवालानुसार सहसंचालकांनी 28 ऑगस्टला कारखान्याचे अध्यक्ष पवार यांना नोटीस बजावली होती. पवार यांच्याकडून या नोटिशीला दहा सप्टेंबर रोजी उत्तर दिले होते.

त्यानंतर सहसंचालकांसमोर सुनावणी झाली. अर्जदार बेंद्रे यांच्यातर्फे ऍड. सोनाली राजे भोसले; तर पवार यांच्यातर्फे ऍड. एस. जे. खुर्जेकर यांनी बाजू मांडली. या बाजू ऐकून प्रादेशिक सहसंचालक धनंजय डोईफोडे यांनी पवार यांना कारखान्याच्या संचालकपदावरून दूर करण्याचा आदेश 24 डिसेंबरला दिला. तसेच, आदेशापासून समितीच्या पुढच्या एका कालावधीची मुदत संपेपर्यंत कोणत्याही संस्थेच्या कोणत्याही समितीचा सदस्य म्हणून पुन्हा निवडून येण्यास, पुन्हा स्वीकृत केले जाण्यास किंवा पुन्हा नामनिर्देशित केले जाण्यास पात्र असणार नाहीत, असे या निकालात म्हटले आहे

कारखान्याच्या जागेवरील शिक्षण संस्थेत या परिसरातील शेतकऱ्यांची मुले शिकत आहेत. असे असले; तरी यासंदर्भात उच्च न्यायालयात गेलो असून, आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत. उच्च न्यायालयाने निकालाला स्थगिती दिली आहे, अशी माहिती पवार यांच्या निकटवर्तींयांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या