वळसे पाटील यांच्यावर नाइलाजाने माघार घेण्याची वेळ...

Image may contain: outdoor
शिरूर, ता. १२ जानेवारी २०२० : जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीवरून जिल्ह्यातील दोन दिलीप पाटलांमध्येच सुरू झालेल्या रस्सीखेचमध्ये अखेर खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी बाजी मारली आहे. मोहिते पाटलांच्या हट्टामुळे अखेर राज्यात कॅबिनेट मंत्रिपदावर कार्यरत असलेल्या दिलीप वळसे पाटील यांच्यावर नाइलाजाने का होईना माघार घेण्याची वेळ आली.

पुणे जिल्हा परिषदेचे आगामी अडीच वर्षासाठीचे अध्यक्षपद खुल्या गटातील महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे या पदावर आपल्याच विधानसभा मतदारसंघातील आणि आपल्याच कार्यकर्त्यांची निवड व्हावी, अशी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची होती. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दहा आमदार आहेत. यापैकी दौंड येथे भाजप तर, भोर आणि पुरंदरला कॉंग्रेसचे आमदार आहेत. शिवाय जुन्नर तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे महिला जिल्हा परिषद सदस्य नव्हती. त्यामुळे हा मतदारसंघ आपोआपच अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाद झाला. यामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीत बारामती, इंदापूर, शिरूर, खेड, आंबेगाव आणि मावळ हे सहाच तालुके शिल्लक राहिले होते.

या सहापैकीही मावळते अध्यक्ष विश्‍वास देवकाते हे बारामती तालुक्‍यातील असल्याने, अजित पवार यांचा बारामती हा तालुका या शर्यतीतून बाद झाला. त्यामुळे उर्वरित पाच आमदारांपैकी अशोक पवार, दिलीप मोहिते आणि सुनील शेळके या तीन आमदारांनी मंत्रिपदाचे कारण पुढे करत, वळसे पाटील यांच्या आंबेगाव आणि दत्तात्रेय भरणे यांच्या इंदापूर तालुक्‍याचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यशही आहे. या सर्व घडामोडींमुळे शेवटच्या टप्प्यात अध्यक्षपदाच्या शर्यतीत शिरूर, मावळ आणि खेड या तीन विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिल्लक राहिले.

त्यामुळे शेवटच्या क्षणी अध्यक्षपदाच्या शर्यतीत शिरूरमधील दोन आणि खेड आणि मावळमधील प्रत्येकी एक, याप्रमाणे केवळ चार महिला अध्यक्षपदाच्या रिंगणात टिकून राहिल्या होत्या. त्यातही शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी सुजाता पवार यांचे नाव पुढे केले. यामुळे नात्याच्या मुद्यावरून सुजाता पवार यांचे नाव मागे पडले. त्यामुळे या स्पर्धेत केवळ तीनच नावे उरली होती. त्यात शोभा कदम (मावळ), स्वाती पाचुंदकर (शिरूर) आणि निर्मला पानसरे (खेड) यांचा समावेश होता. यापैकी शोभा कदम यांचा पत्ता हा कमी शिक्षणाच्या मुद्यावरून कट झाला. त्यामुळे अगदी शेवटच्या टप्प्यात स्वाती पाचुंदकर आणि निर्मला पानसरे ही दोनच नावे अध्यक्षपदाच्या शर्यतीत टिकून राहिली होती. त्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब करणे बाकी राहिले होते.


या दोनपैकी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील स्वाती पाचुंदकर यांच्या तर, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील निर्मला पानसरे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. त्यामुळे अखेरच्या क्षणी अध्यक्षपदाच्या नाव निश्‍चितीच्या शर्यतीत आंबेगाव आणि खेड या दोन तालुक्‍यांच्या पाटील आमदारांमध्येच मोठी चुरस निर्माण झाली होती. परंतु या शर्यतीत वळसे पाटील यांना मंत्रीपदामुळे अध्यक्षपदाच्या आग्रह सोडावा लागला. परिणामी स्पर्धेत एका पदासाठी एकच नाव शिल्लक राहिले. ते म्हणजे निर्मला पानसरे होय. मात्र या निवडीने दोन दिलीप पाटलांमध्ये खेडच्या आमदार दिलीप मोहिते पाटलांनी कॅबिनेटमंत्री असलेल्या आंबेगावच्या दिलीप वळसे पाटलांवर बाजी मारण्यात यश मिळविल्याची चर्चा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्तुळात रंगली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या