वीज अपघात टाळण्यासाठी सतर्क राहा...

Image may contain: text that says 'वीज खांबाला किंवा स्टे ला गुरे ढोरे बांधू नका, ते प्राणांतिक अपघाताला आमंत्रण होय.'
बारामती, ता. १४ जानेवारी २०२०: जीवनाश्यक झालेली वीज दिसत नाही. मात्र,तिचे परिणाम भयावह असतात.जीवघेणे असतात.विजेपासून फायदा होत असला तरी तिचा वापर करताना वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधगिरी बाळगली नाही.तर जीवघेणे नुकसान सुद्धा होऊ शकते.जाणते किंवा अजाणतेपणी कोणत्याही क्षणी झालेली चूक ही वीज माफ करीत नाही.त्यामुळे घर,कार्यालय,शेती,उद्योग,व्यवसाय आदींसह सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा व विद्युत उपकरणे यापासून सतर्क व सावध राहणे अतिशय आवश्यक आहे.

वीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची स्थिती योग्य असल्याबाबतची खात्री अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून करून घ्यावी व घरातील वीजजोडणीसाठी लागणारे साहित्य आय.एस.आय. प्रमाणित असावे. १० वर्षांपेक्षा अधिक जुन्या वायरिंगची तपासणी करून घेणे घ्यावी.तसेच सर्व प्लग पाईंट,हिटर,फ्रिजसाठी आर्थिंग योग्य असल्याबाबतची खबरदारी घेत राहावी.योग्य आर्थिंगमुळे शॉकची तीव्रता कमी होते.तसेच मिक्सर,हिटर,गिझर,वातानुकूलित यंत्र,फ्रीज या उपकरणांसाठी थ्री पिन सॉकेटचाच वापर करावा.अशा थ्री पिन सॉकेटमध्ये आर्थिंगची व्यवस्था असते.

घराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व त्याच्या शेजारी असलेल्या किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये.त्याऐवजी अल्यूमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची वितळ (फ्यूज) तार वापरली पाहिजे.अशी फ्यूज वायर वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो.तांब्याची एकेरी,दुहेरी वेढ्याची तार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.ELCB म्हणजेच (Earth leakage circuit Breaker) या उपकरणामुळे वीज अपघात टळू शकतो किंवा घरातील महागड्या उपकरणांचे नुकसान होणार नाही.घरात कुठेही ३५ मिली अ‍ॅम्पियरचे लीकेज असेल,तर ही ELCB ट्रीप होते व विजेचा पुरवठा बंद पडतो.लीकेज काढणे किंवा त्याची दुरुस्ती करेपर्यंत विजेचा प्रवाह सुरूच होत नाही.घरात हे योग्य कॅपॅसिटीचे उपकरण बसवून घेतल्यास वीज अपघाताचा धोका कमी होतो.

ओलसर जागा, पाण्याचे नळ,गॅस पाईप यापासून वायरिंग दूर ठेवण्यात यावी.वायरच्या इन्सूलेशनवर ओलसर भागाचा परिणाम होऊन करंट येण्याची शक्यता असते.घरातील विशेषतः पत्र्याच्या शेडमध्ये व जनावराच्या गोठ्यामध्ये असलेल्या वीजयंत्रणेचे आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी.घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्वीच तात्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे.ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये.विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही,याची दक्षता घ्यावी.विशेषतः पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात.घरातील वायरिंगची काळजी घ्यावी व कुठल्याही विद्युत उपकरणाशी खेळू नये.लहान मुलांना त्यापासून दूर ठेवावे.विद्युत उपकरणामधील कनेक्शनची माहिती नसताना ते दुरुस्त करु नये किंवा त्यात कोणतेही बदल करू नये.उपकरण दुरुस्त करावयाचे असल्यास त्याचा प्रथम वीजपुरवठा बंद करावा व काम करावे.घरामध्ये वायरिंगची कोणतीही दुरुस्ती करावयाची झाल्यास प्रथम मेन-स्विच बंद करावा व मग काम करावे.

घरांतील वायरिंग खूप जुने झाले असल्यास ते बदलून घ्यायला पाहिजे.घरात ओल येत असल्यास तसेच वायरिंग जुने झाले असल्यास लीकेज करंटची समस्या वाढते.त्यामुळे शॉक लागण्याची तसेच इलेक्ट्रीक बिल जास्त येण्याची शक्यता वाढते. घरातील दूरचित्रवाणी,संगणक व इतर सर्व उपकरणांचा वीज प्रवाह काम संपल्यानंतर स्वीच बोर्डावरील स्वीचपासून बंद केला पाहिजे.घरामध्ये कुठेही विद्युत प्रवाह असलेली वायर उघडी राहू देऊ नये.उघडी वायर असल्यास इन्शुलेसन टेप गुंडाळावा.दरवर्षी उन्हाळा तापदायक ठरत असल्याने पुण्याच्या शहरी भागातही आता कुलरचा वापर वाढत आहे.कुलरमधे पाणी भरताना स्वीच बंद करून व प्लग पिन काढून ठेवल्यानंतरच कुलरमध्ये पाणी भरावे.त्यानंतर स्वीच चालू करावे.कुलरचे अर्थिग चांगले असल्यास लिकेज करंट येत नाही.

घरातील वायरिंग किंवा विद्युत संच मांडणीची कामे मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडूनच करून घ्यावेत.ते कायद्याने बंधनकारक आहे.वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स,केबल्स,केसिंग,पी.व्ही.सी.पाइप,स्विचेस,सर्किट ब्रेकर्स आदी साहित्य हे दर्जेदार व आय.एस.आय.मार्कचे असणे आवश्यक आहे.घरातील वीजभारानुसार योग्य क्षमतेचे फ्यूज,वायर्स,स्विचेस यांचा वापर करावा.एका उपकरणासाठी एकच प्लग सॉकेट व पीन टॉपचा वापर करा.मल्टी पीन टॉप वापरून अनेक उपकरणे एकाच सॉकेटमध्ये जोडू नका.तात्पुरते वायरिंग शक्यतो टाळले पाहिजे.घरात ओल्या हाताने स्वीच चालू किंवा बंद करू नका.धातूचे आवरण असलेली विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका.बाथरूममधील वॉटर हीटर्स,गीझर्स चालू-बंद करताना विशेष काळजी घेतली पाहिजे.

वीजयंत्रणेच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक वस्तुंपासून सावध राहणे अतिशय आवश्यक आहे.विहिरीतून किंवा नदीपात्रातून शेतीपंप बाहेर काढणे,स्विचबोर्ड व वायर्स हाताळणे,घराबाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये साध्या वायर्समधून वीजपुरवठा घेणे तसेच तुटलेल्या वीजतारा,खाली पडलेले वीजखांब आदींना हटविण्याचा प्रयत्न करणे,ओल्या लाकडी काठ्या किंवा लोखंडी वस्तुंच्या सहाय्याने वीजयंत्रणेच्या संपर्कात येणे अशा अनेक प्रकारांमुळे वीजअपघातांचा धोका वाढल्याचे दिसून येत आहे.

तसेच विजेच्या खाबांना किंवा स्टेवायरला जनावरे बांधू नये व त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नयेत.शहरी व ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी किंवा नागरिक विद्युत खांबांना सायकली टेकवून ठेवतात.ते टाळावे किंवा असे प्रकार आढल्यास संबंधीतांना सावध करावे.विद्युत खाबांना लोखंडी तार बांधून कपडे वाळत घालू नयेत.या सोबतच सार्वजनिक वीजयंत्रणेपासून सावध राहावे. तुटलेल्या वीजतारा,वीजखांब,रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर,रोहित्राच्या लोखंडी कुंपण,फ्युज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे,शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते.सावधगिरी बाळगल्यास या दुर्घटना टाळता येणे सहजशक्य आहे.

मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने झाडाच्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात.मोठी झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो.परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात.त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध राहावे.या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये.ग्रामीण भागात शेतात किंवा रस्त्याने जाताना विशेषतः पहाटे किंवा सायंकाळी चांगल्या दर्जाच्या टॉर्चचा वापर करावा.शेतामधून किंवा रस्त्यामध्ये तुटून खाली पडलेल्या विजेची तार कुठल्याही परिस्थितीत हटविण्याचा किंवा तारेजवळ जाण्याचा प्रयत्न करून नये.कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे १९१२ किंवा १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे तीन टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत.

निशिकांत राऊत
(जनसंपर्क अधिकारी)
महावितरण बारामतीComment Box is loading comments...

संबंधित बातम्या