पत्नीच्या प्रियकराच्या डोक्यात घातला हातोडा अन्...

शिक्रापूर, ता.१५ जानेवारी २०२० (प्रतिनिधी) : शिक्रापूर येथे वास्तव्यास असलेल्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून सदर महिलेच्या पतीने संशयित युवकाचे डोके हातोडीने ठेचून खून केला असल्याची धक्कादायक घटना घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शिक्रापूर (ता.शिरूर) येथील पाबळ चौक याठिकाणी कैलास बनसोडे यांच्या मालकीच्या सद्गुरू बिल्डींग या ठिकाणी एक महिला तिच्या तीन मुलांसोबत राहत होती. बुधवारी (ता. १५) सकाळच्या सुमारास सदर महिलेच्या घरातून भांडणाचा आवाज येत असताना घरामध्ये सदर महिलेचा पती आयुब शेख व मोईन खान असे दोघे होते, यावेळी आयुब याने मोईनच्या डोक्यात हातोडीने मारून त्याला गंभीर जखमी केले. यावेळी घरातील लहान मुले बाहेर येऊन आरडाओरडा करू लागल्याने शेजारील नागरिकांनी घरात येत जखमी मोईन खान यास तातडीने जवळील खासगी रुग्णालयात हलविले.

यावेळी आयुब शेख हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असतात सदर बिल्डींगच्या मालकीणने आयुबला घरामध्ये ढकलून देत बाहेरून कडी लावून घेतली. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, नवनाथ रानगट, पोलीस नाईक विजय गाले आदींनी घटनास्थळी धाव घेत आरोपी आयुब शेख यास ताब्यात घेतले.

दरम्यान, जखमी मोईन खान याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले परंतु उपचारापूर्वीच मोईन दिलावर खान (वय २२ वर्षे) याचा मृत्यू झाला. याबाबत कैलास मारुती बनसोडे (रा.पाबळ चौक, रक्षक हॉस्पिटल समोर, शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आयुब सिकंदर शेख (रा.वाकत ता.रिसोड जि वाशीम) याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्यास अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट हे करत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या