Video : वाळू माफिया जोमात प्रशासन मात्र कोमात...

Image may contain: sky, outdoor, nature and water
शिंदोडी,ता.१७ जानेवारी २०२० (तेजस फडके): घोड धरणात गेल्या ६ महिन्यांपासून बेसुमार वाळू उपसा चालू असून महसूल विभागाणे अनेक वेळा कारवाई करूनही वाळू माफिया थांबलेले नाहीत.त्यामुळे नदीपात्राची अक्षरशः चाळण झाली असून उन्हाळ्यात धरणाची पाणी पातळी घटल्यावर याचे मोठया प्रमाणावर दुष्परिणाम जाणवणार आहेत.

शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेलं घोड धरण चिंचणी येथे बांधलेले आहे.७ टी एम सी पाणी साठवण क्षमता असलेले हे धरण आहे.हजारो एकर शेती या धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे.परंतू गेल्या अनेक वर्षांपासून भौगोलिक दृष्टया शिरुर तालुक्यात असणाऱ्या दाणेवाडी (ता.श्रीगोंदा) येथे प्रचंड मोठया प्रमाणात बेकायदेशीर रीत्या अवैध वाळू उपसा चालू होता.भौगोलिक दृष्टया दाणेवाडी हे गाव शिरुर  तालुक्यात आहे.परंतु राजकीय दृष्टया दाणेवाडी हे गाव श्रीगोंदा तालुक्यात असल्यामुळे शिरुरच्या तहसीलदारांना कारवाई करण्यास राजकीय दबाव येत होता.दाणेवाडी येथील वाळूचा साठा संपल्यानंतर वाळू माफियांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळवला.

घोड धरणात पिंपळाचीवाडी,कुऱ्हाडवाडी येथे वाळू उपसा करण्यास सुरुवात केली.स्थानिक तरुणांना हाताशी धरून त्यांना पैशाचे अमिश दाखवून त्यांनाही वाळू उपसा करण्यास प्रवृत्त केले.तसेच काही स्थानिक तरुणांना वाळू उपश्यात भागीदारी दिली.त्यामुळे स्थानिक तरुणांनी त्यानं वाळू वाहण्यास व वाळू साठवण्यास मदत केली.रात्रंदिवस चालू असलेल्या या वाळू उपशामुळे स्थानिक नागरिकांना मोठया प्रमाणात त्रास होऊ लागल्याने त्यांनी  याबाबत शिरुर तहसीलदारांकडे  वारंवार तक्रार केली.त्यानंतर शिरुर आणि श्रीगोंदा महसूल खात्याच्या वतीने संयुक्तिक कारवाई करण्यात आली.यामध्ये सुमारे २७ बोटी
जिलेटीनच्या साह्याने उडवण्यात आल्या आणि दंडात्मक कारवाई करण्यात आली.त्यानंतर पिंपळाचीवाडी व कुऱ्हाडवाडी येथील वाळू उपसा पूर्ण बंद झाला

शिरुर तालुक्यातील वाळू माफिया शांत झाल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील वाळू माफियांनी घोड धरणात यांत्रिक बोटींच्या साह्याने शिंदोडीच्या हद्दीत वाळू उपसा  सुरु केला आहे.शिंदोडी ग्रामस्थांनी याबाबत वेळोवेळी स्थानिक तलाठी,सर्कल,तसेच तहसीलदार यांचाकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.परंतु वाळू माफिया वाळू उपसा करून माठ,राजापूर या श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीतील गावात वाळूची साठवण व वाहतूक करतात.त्यामुळे शिरुर तहसीलदारांना कारवाई करण्यास अडचण येत आहे.त्यामुळे श्रीगोंदा येथील तहसीलदारांनी वाळू माफियांवर कारवाई करावी अशी मागणी शिंदोडी ग्रामस्थांनी केली आहे.याबाबत उपविभागीय प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि,लवकरच शिरुर आणि श्रीगोंदा महसूल विभागाच्या वतीने वाळू माफियांवर संयुक्तिक कारवाई करण्यात येईल.

श्रीगोंदा तालुक्यातील अनेक राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते सध्या घोड धरणात वाळु उपसा करण्यात सक्रिय झाले आहेत.त्यामुळे घोड धरणाच्या कडेला असणाऱ्या माठ,राजापुर,म्हसे या गावातुन हि वाळु तस्करी होत आहे.राजकीय पाठबळ असल्यानेच या वाळू माफियांवर महसुल विभागाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.शिरुर तालुक्यात राष्ट्रवादीशी सलगी असणारा आणि श्रीगोंदा तालुक्यात भाजपाशी जवळीक साधुन असलेला आणि राजकारणात मोठे प्रस्थ असलेला एक नेता वाळु माफियांसाठी शिंदोडी ग्रामस्थांशी मध्यस्थी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या