ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणे आवश्यक

मुंबई, ता.२१ जानेवारी २०२० (प्रतिनिधी): "प्रशासनात प्रत्येक अधिकारी हा जनतेस बांधिल असतो. त्यामुळे महावितरणमध्ये प्रत्येकाने ग्राहकांचे हित समोर ठेऊन काम केले पाहिजे. ग्राहकाला विश्वासात घेऊन जनतेशी संबंधित कामाच्या सोप्या पद्धती विकसित केल्यास प्रत्येक योजना यशस्वी होऊ शकते. या सर्व बाबी  महावितरणमधील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने राबवता आल्या.यामुळे वीज क्षेत्रात अनेक सकारात्मक बदल करता आले.म्हणूनच महावितरणमध्ये काम करणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता." अशा भावना महावितरणचे  मावळते अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी व्यक्त केल्या.

संजीव कुमार यांची नुकतीच राज्याच्या विक्रीकर विभागाचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यानिमित्ताने आयोजित निरोप समारंभास उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानिर्मिती कंपनीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक शैला ए. होत्या. तर संचालनचे संचालक दिनेशचंद्र साबू,वाणिज्यचे संचालक सतीश चव्हाण, वित्तचे संचालक जयकुमार श्रीनिवासन, मा.सं.चे संचालक ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) पवन कुमार गंजू यांची प्रमुख उपस्थिती होती.

संजीव कुमार पुढे म्हणाले,"राज्यात प्रत्येक नागरिकाला किफायतशीर दरात आणि गरजेएवढी वीज उपलब्ध झाली पाहिजे.त्यासाठी आपण बांधिल आहोत. आपल्या  महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत प्रचंड क्षमता आहे. आपल्या क्षमतांची पुनर्बांधणी केल्यास त्यात अधिक गती येईल. याकरिता सिस्टम बेस्ड अँप्रोच असणे गरजेचे आहे". यावेळी प्रधान ऊर्जा सचिव असीमकुमार गुप्ता यांनी ग्राहक सेवेत डिजिटलायझेशन महत्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषण महानिर्मिती कंपनीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक शैला ए. यांनी केले.

यावेळी दिनेशचंद्र साबू, सतीश चव्हाण, जयकुमार श्रीनिवासन,ब्रिगेडियर पवन कुमार गंजू यांनी मनोगत व्यक्त केले.तर प्रकाशगड व क्षेत्रीयस्तरावर कार्यरत वरिष्ठ अधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी संजीव कुमार यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी केले. या कार्यक्रमास महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे, महापारेषणचे संचालक संजय ताकसांडे व मुख्यालयातील सर्व कार्यकारी संचालक, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या