सोसायटयांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची फराटेंची मागणी

शिरुर, ता. २२ जानेवारी २०२०(प्रतिनीधी) :  कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विविध कार्यकारी सहकारी संस्था (सोसायटी) यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे इनामदार यांनी मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

याबाबत राज्याचे मुख्यमंञी उद्धव ठाकरे व उपमुख्यमंञी अजित पवार यांची फराटे यांनी नुकतीच भेट घेतली.त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, राज्यातील शेतकऱ्यांना गेली 3 वर्षे निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक संकटांना सातत्याने तोंड द्यावे लागले आहे. आधी कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ,नंतर अवकाळी पाऊस, गारपीट व महापूर यांसारख्या संकटाना सामोरे जावे लागले.त्यामुळे राज्यातील शेतकरी पिके गेल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झालेने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. शेतकरी हा कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असणाऱ्या गावोगावच्या विविध कार्यकारी सेवा संस्था यांच्या आगामी  ३ महिन्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार थकबाकीदार सभासद शेतकरी मतदानास अपात्र होणार आहेत.

कर्जमाफीची तांत्रिक तयारी चालू आहे. कर्जमाफी मिळण्यास वेळ जाणार असल्याने कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत विविध कार्यकारी सहकारी संस्था (सोसायटी) यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान शिरुर तालुक्यात मांडवगण फराटा हे मोठे गाव असुन परिसरात अपघात व सर्पदंश रुग्णांचे प्रमाण मोठे असल्याने २० किलोमीटर च्या परिसरातील नागरिकांसाठी तातडीने १०८ रुग्णवाहिका मिळावी अशीही मागणी निवेदनाद्वारे केली. शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील व शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटुन मागण्यांचे निवेदन फराटे यांनी दिले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या