प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो बरं?

Image may contain: one or more people, crowd and outdoor
शिरूर, ता. 24 जानेवारी 2020: 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक भारतीयासाठी आनंदोत्सव असतो. संपूर्ण देशात तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राजपथावरील संचलन हे याचे खास आकर्षण. पण हा दिवस का साजरा केला जातो, याबाबत अनेकांना माहिती नसते. यासाठीच आपण प्रजासत्ताक दिनाचे महत्व जाणून घेणार आहोत.

अनेकदा स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिन यामध्ये काहींची गफलत होते. त्यामुळे या दोन्हीबाबत जाणून घेणे खुप महत्वाचे आहे, तेव्हाच दोन्ही दिवसांचे भारतीय नागरिक म्हणून आपल्याला नेमके महत्व समजू शकते. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्याने हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. परंतु, स्वातंत्र्य दिन जाहिर होण्यापूर्वीच म्हणजे 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर येथे काँग्रेसचे अधिवेशन झाले. या अधिवेशनातच पंडित जवाहरलाल नेहरूंनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. तसेच यावेळी तिरंगा ध्वजही फडकावण्यात आला होता. या दिवसाची आठवण म्हणून याच दिवशी भारताची राज्यघटना अंमलात आणण्याचे ठरले.


देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला. त्यानंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्यात आली. हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारण्यात आले. 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि 26 जानेवारीपासून भारतात लोकशाही पर्व सुरू झाले. भारत देश या दिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य झाला. याच दिवशी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस सुरू होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या