पुणे जिल्हा परिषदेचा कोण होणार सभापती?

शिरूर, ता. 24 जानेवारी 2020: पुणे जिल्हा परिषदेच्या विषय समिती पदाच्या (सभापती) निवडी आज (शुक्रवार) दुपारी होणार आहेत. त्यामुळे इच्छुकांकडून अखेरच्या टप्प्यात मोर्चेबांधणी सुरू आहे. सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर आज सकाळी अकरा वाजल्यापासून सभापतिपदाच्या निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामध्ये शिक्षण आणि अर्थ, बांधकाम व आरोग्य, समाजकल्याण, महिला व बालकल्याण तसेच कृषी आणि पशुसंवर्धन या विभागासाठी या निवडी होणार असून, याच दिवशी खातेवाटपही होणार आहे.


जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे पंचायत, सामान्य प्रशासन, जलसंधारण, पाणी व स्वच्छता या विभागाची जबाबदारी असते. तर अन्य विभागामध्ये शिक्षण आणि अर्थ समितीची जबाबदारी उपाध्यक्षाकडे असते. त्यामुळे अन्य चार समितीसाठी या निवडी होणार असल्याने, साधारण चार सभापतिंची यावेळी निवड करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता असल्यामुळे या सभापतिपदासाठी राष्ट्रवादीचे सर्वच सदस्य इच्छुक आहेत. अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपद नाही तर किमान सभापतिपद तरी मिळावे, अशी मागणी पक्षातील नेत्यांसह पक्षाचे सर्वेसर्वा यांच्याकडे केली जात आहे. त्यातच महाविकास आघाडीमुळे एखादे पद मित्रपक्षाला द्यावे लागणार का? हे आजच्या निवडीत स्पष्ट होईल.

पुणे जिल्हा परिषदेच्या विषय समिती निवडीमध्ये मित्रपक्षाला संधी द्यावी, अशी मागणी शिवसेना आणि कॉंग्रेस या दोन्ही मित्रपक्षाकडून करण्यात आली आहे. परंतु मागील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवर महिला सदस्यांनी घातलेला गोंधळ लक्षात घेता, सभापती निवडीलाही मित्रपक्ष गोंधळ घालण्याची शक्‍यता असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या