पुणे-नगर रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी...

शिक्रापूर, ता. 27 जानेवारी 2020: पुणे-नगर महामार्गावर वाघोली ते शिक्रापूर या ठिकाणी होणारी वाहतूककोंडी प्रशासनाची डोकेदुखी बनत असून, अनेकदा नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे; परंतु, सदर वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रशासनकडून विविध उपाययोजना करण्यात येत असताना आता पुणे-नगर महामार्गावर ठराविक वेळेत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण चौक, कोरेगाव भीमा, सणसवाडी आणि शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील करंदी फाटा येथे नेहमीच वाहतूककोंडी होत असल्यामुळे स्थानिकांसह रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णवाहिकांना देखील वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.


शिक्रापूर, जातेगाव, करंदी, कासारी येथील ग्रामपंचायतींनी पत्राद्वारे पुणे-नगर, तसेच शिक्रापूर-चाकण रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी यापूर्वी केली होती. त्या पत्रानुसार जिल्हा अधिकारी नवलकिशोर राम यांनी मोटार वाहन कायदा 1988 च्या कलमान्वये पुणे-नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा ते कोंढापुरी, तसेच शिक्रापूर-चाकण रस्त्यावर शिक्रापूर ते वाजेवाडी-चौफुला या दरम्यान अवजड वाहनांना बंदी घातली आहे.त्या आदेशावर कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले आहेत, तर याबाबत नुकतेच पुणे-नगर महामार्ग वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप येळे, अक्षय सुपे, शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक राजेंद्र मदने यांनी पुणे-नगर महामार्गावर ठिकठिकाणी फलक लावले आहे.


दरम्यान, शिक्रापूर येथे होत असलेली वाहतूक कोंडी नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. ही कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजन केल्या जात आहेत. त्यातच सध्या शिक्रापुरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांना जॅमर लावत कारवाई करण्यास शिक्रापूर पोलिसांनी प्रारंभ केला असून, दररोज 30 ते 35 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याने कोंडी लवकरच फुटण्याची आशा पोलिसांनी व्यक्‍त केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या