खोटं सांगून लग्न मोडल्याने दोघांवर गुन्हा दाखल...

Image may contain: text

शिक्रापूर, ता. १ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): "लग्न ठरलेल्या मुलीशी लग्न करू नका. कारण, लग्नानंतर संबंधित मुलीला घेऊन आम्ही पळून जाणार आहोत,'असे खोटे सांगितल्यामुळे एक लग्न मोडण्याचा प्रकार नुकताच शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिस स्टेशन हद्दीत घडला.संबंधित मुलीच्या तक्रारीनुसार,केतन बाळासाहेब नऱ्हे व दादाभाऊ नवनाथ बगाटे (दोघेही रा.पाबळ, ता. शिरूर) यांच्यावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


शिक्रापूर पोलिसांनी माहिती दिली की,तक्रारदार महाविद्यालयीन युवती एक वर्षापूर्वी शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील महाविद्यालयात जात असताना संशयित आरोपी केतन नऱ्हे हा दुचाकीवरून मागून आला व गाडीवर बसण्याचा आग्रह करू लागला. मात्र, तिने गाडीवर बसण्यास नकार दिल्याने त्याने छेड काढली व तिथून निघून गेला. युवतीने झालेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.संबंधित युवतीचा विवाह नुकताच ठरला. ही बाब नऱ्हे व त्याचा मित्र बगाटे या दोघांना समजली.


त्या दोघांनी युवतीचे लग्न ठरलेल्या मुलाच्या मित्रास ही बाब कळविली व लग्न झाल्यास संबंधित मुलीसोबत पळून जाणार असल्याचे सांगितले.त्यातून लग्न मोडले व मुलीची नाहक बदनामीही झाली.याबाबत संबंधित युवतीने शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दिली.त्यावरून या दोन्ही संशयित आरोपींवर युवतीच्या बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत दोन्ही आरोपींना शोधण्यासाठी शिक्रापूर पोलिस रवाना झाले असून, दोघेही फरारी असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या