शिक्रापूर येथे पोलिसांकडून चौथा आरोपी जेरबंद...

Image may contain: one or more people and people standing

शिक्रापूर, ता. ५ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): कासारी (ता.शिरूर) येथील जमिनीचे खरेदीखत चार वर्षांपूर्वी बनावट व्यक्ती उभी करून केल्या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात चौथ्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी नुकतीच अटक केली.एकूण सहा आरोपींपैकी ताब्यात घेतलेला हा चौथा आरोपी असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांनी दिली.

निलेश अशोक भुजबळ (रा.शिक्रापूर,ता.शिरूर) असे या आरोपीचे नाव आहे.कासारी येथील एकूण ४१ गुंठे शेतीचे चार वर्षांपूर्वी खरेदीखत करताना सूर्यकांत सीताराम आगरकर,रामकृष्ण नारायण आगरकर (दोघेही रा.पाबळ, ता.शिरूर),पिराजी सुरेश शिवरकर,श्रीकृष्ण मधुकर भुजबळ,अमोल काळूराम शिवरकर (तिघेही रा.कासारी) व निलेश अशोक भुजबळ (रा.शिक्रापूर) यांनी मिळून बनावट व्यक्ती उभी करुन जमीन मालक असल्याचे तळेगाव दुय्यम निबंधक यांना भासविले.

याबाबत पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्याकडून एका पत्राच्या आधारे तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक रवींद्र भास्कर फुलपगारे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार या सहा जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दाखल गुन्ह्यातील पिराजी शिवरकर, रामकृष्ण आगरकर व अमोल शिवरकर यांना महिना भरापूर्वी अटक करण्यात आली असून तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली गेल्याने तिघे देखील सध्या येरवडा कारागृहात आहेत.

इतर तिघांच्या तपासावर शिक्रापूर पोलीस असताना तीन फेब्रुवारी रोजी उपनिरीक्षक राजेश माळी यांनी पाळत ठेवून निलेश भुजबळ याला येथील एल अँड टी फाट्यावर अटक केली.निलेश भुजबळ याला आज शिरुर न्यायलायात हजर केले असता त्याला पुढील तपासासाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

या आरोपींवर केवळ फसवणुकीचा गुन्हा दाखल नसून बनावट कागदपत्रे सादर करून संपूर्ण व्यवहार कायदेशीर दाखविण्याचा प्रकार केला गेल्याने वरील सर्व आरोपींवर फसवणुकीसह बनावट कागदपत्रे तयार केल्याचाही गंभीर गुन्हा दाखल आहे.वरील चार आरोपी ताब्यात आले असून उर्वरित दोन आरोपींसाठी पोलिस पथके रवाना केलेली आहेत.या प्रकरणात आरोप सिद्ध करता येईल,असे पुरावे आमचेकडे असून आरोप सिद्ध झाल्यास आरोपी आजिवन कारावासाच्या शिक्षेपर्यंत जातील.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या