वाबळेवाडीच्या जि. प. शाळेत प्रवेशासाठी 'एवढी' प्रतीक्षा

वाबळेवाडी, ता. 6 फेब्रुवारी 2020: वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी प्रवेश प्रतीक्षा यादीचाही उच्चांक झाला आहे. केवळ 32 पटसंख्येवरून सध्या सहाशे विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणाऱ्या या शाळेत प्रवेशाची प्रतीक्षा यादी पाच हजारांवर गेल्याने आता नवी नोंद घेणेही थांबवावे लागले आहे, असे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी सांगितले.

राज्यातील पहिली टॅबलेट शाळा, जगातली तिसरी आणि भारतातील पहिली ओझोन व झिरो एनर्जी स्कूल यासह विविध वैशिष्ट्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारूपाला आलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून या शाळेने नावलौकिक मिळवला आहे.राज्यात सध्या जिल्हा परिषद शाळेत किमान पटसंख्येसाठी शिक्षकांना दारोदार जावे लागत असताना वाबळेवाडी शाळेच्या यशाची ही किमया साधणारे राष्ट्रपती पारितोषिक विजेते शिक्षक दत्तात्रय वारे व एकनाथ खैरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे कार्य रोल मॉडेल ठरले आहे. दोन गळक्‍या खोल्या व पडक्‍या भिंतींच्या या दोन शिक्षकी शाळेत 2012 मध्ये बदली होऊन आलेल्या दत्तात्रय वारे यांनी खैरे गुरुजी व ग्रामस्थांच्या सहभागातून प्रयत्न करीत शाळेचे चित्रच बदलले.

त्यासाठी गावातील 19 महिला बचत गटांनी होणारा नफा शाळेला दिला. तर गावातल्या तरुणांनीही यात्रा, नवरात्र व गणेशोत्सवाचा खर्च टाळून शाळेला निधी दिला. तर यात्रेच्या तमाशासाठी जमलेले सुमारे सव्वा लाख रुपयेही ग्रामस्थांनी शाळेला दिले. त्या रकमेतून वारे गुरुजींनी विद्यार्थ्यांसाठी टॅब घेतले. अन्‌ वाबळेवाडी हे महाराष्ट्रातील पहिले टॅब स्कूल ठरले. वाढत्या विद्यार्थी संख्येसाठी ग्रामस्थांनी दीड एकर जमीन बक्षीसपत्र करून शाळेला दिली. अन शाळेत सर्वांगीण परिवर्तन घडले. वारे गुरुजी व खैरे गुरुजी या दोन्ही शिक्षकांनी अभिनव संकल्पना व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत शाळेची पटसंख्याही दोनशेवर नेली. राज्य सरकारने शाळेत 10 शिक्षकांची नियुक्ती केली असून, सध्या शाळेत 12 शिक्षक कार्यरत आहेत.विद्यार्थ्यांचा चतुरस्र विकास करण्याची "ओजस' शिक्षणपद्धती येथे राबविली जाते. या उपक्रमातून शाळेत बारावीपर्यंत टप्प्याटप्प्याने वर्ग सुरू होणार असून, सध्या नववीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. सध्या शाळेची विद्यार्थिसंख्या सुमारे सहाशेच्या वर गेली आहे. येथील विद्यार्थी टॅबलेटसह आधुनिक साधने सहज हाताळत 19 अंकी रक्कमही वाचू शकतात, तर वाबळेवाडी शाळेतील एका विद्यार्थ्याने "वायफाय' पेक्षाही प्रभावी असे "लायफाय' तंत्रज्ञानाचे सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दरम्यान, शाळेच्या या नावलौकिकामुळे बॅंक ऑफ न्यूयॉर्क तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मदतीने आंतरराष्ट्रीय दर्जाला जुळणाऱ्या आठ वर्गखोल्यांसह वाबळेवाडीत "झिरो एनर्जी स्कूल'ची निर्मिती करण्यात आली. जगभरात जपान आणि आयर्लंडनंतर वाबळेवाडी ही जगातली ही तिसरी "झिरो एनर्जी स्कूल' शाळा ठरली. येथे मुलांना पोहणे, संगीत, नाटक यासह श्रमसंस्कारांचे महत्त्व पटवले जाते. त्यासाठी पंचक्रोशीत एक लाख वृक्षांची लागवड करण्यात आली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या