शिरूरकर म्हणतात, मी वाहतुकीची शिस्त...

Image may contain: sky and outdoorशिरूर, ता. 12 फेब्रुवारी 2020: शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी शिरूरकरांनी आचारसंहिता केली असून, "मी वाहतुकीची शिस्त बिघडवणार नाही व दुसऱ्यालाही बिघडवू देणार नाही,' असा निर्धार नागरिकांनी समन्वय सभेत केला.

शिरूर शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे 29 जानेवारीला दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. त्यानंतर नगरपालिका व पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेत रस्त्याकडेची अतिक्रमणे काही प्रमाणात हटविली, तसेच गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काही प्रमाणात रुंदीकरणाचे कामही हाती घेतले. या पार्श्‍वभूमीवर वाहतूकव्यवस्था, पार्किंग, पथारीवाले व्यवस्थापन, या विषयावर नगरपरिषदेच्या रसिकलाल धारीवाल सभागृहात सभा झाली.या वेळी शहरातील अतिक्रमणे, वाहनधारक, दुचाकीचालक व टपरीधारकांची बेशिस्त, व्यावसायिकांकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून केले जाणारे अतिक्रमण आणि शाळा, कॉलेज परिसरात होणारी वाहतूक कोंडी, विद्यार्थिवर्गाची असुरक्षितता, यावर अनेकांनी मते मांडली. वाढती उपनगरे, लोकसंख्यावाढ यामुळे शहरातील वाहतुकीचे नियोजन दिवसेंदिवस कोलमडत असून, वाढत्या वाहतुकीला शिस्त न लागल्यास भविष्यात गंभीर समस्या उभ्या राहू शकतात, अशी भीती काहींनी व्यक्त केली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी वाहतुकीला शिस्त, अतिक्रमणधारकांवर कारवाई, रस्त्याकडेचे अतिक्रमण हटविणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक काबुगडे यांनी केले. पोलिससंख्या अपुरी असून, इतर अनेक कामांत पोलिस दल गुंतत असल्याने वाहतुकीबाबत नागरिकांनी स्वतः काही कर्तव्ये पाळावीत, अशी सूचना त्यांनी केले. नागरिकांनी या सभेत केलेल्या विविध सूचनांची दखल घेऊन येत्या आठ दिवसांत वाहतूक सुरक्षिततेचा कृती आराखडा तयार केला जाईल, असे मुख्याधिकारी रोकडे यांनी सांगितले.नगराध्यक्षा वैशाली वाखारे, नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाश धारीवाल, सहायक पोलिस निरीक्षक बी. एन. काबुगडे, एसटीचे आगार व्यवस्थापक महेंद्र माघाडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह शहरातील विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व छोटे व्यावसायिक, टपरीधारक या सभेस उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या