वीजबिलांच्या दुरुस्तीची वेळ येऊ देऊ नका...

Image may contain: sky, cloud and night
बारामती, ता. १४ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): वीजबिलांच्या दुरुस्तीची वेळच येणार नाही अशा प्रकारची उपाययोजना ग्राहकांकडे बिल देण्यापूर्वीच करण्यात यावी.महावितरणच्या वेबकन्सोलवर उपलब्ध असलेल्या वीजबिलांच्या माहितीचे दैनंदिन निरीक्षण करून ही उपाययोजना करावी,असे निर्देश प्रभारी प्रादेशिक संचालक सुनील पावडे यांनी दिले.

दरम्यान, ज्या ठिकाणी पायाभूत यंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा घरगुती,वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांनी कोटेशनच्या रकमेचा भरणा केला असल्यास त्यांना तत्काळ नवीन वीजजोडणी देण्यात यावी व त्याची नोंद महावितरणच्या प्रणालीमध्ये करण्यात यावी.यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,असे पावडे यांनी स्पष्ट केले.

बारामती मंडल तसेच सोलापूर व सातारा जिल्ह्यातील महावितरणच्या प्रशासकीय कामांची आढावा बैठक बारामती येथील ऊर्जाभवनात मंगळवारी (दि.११) रोजी झाली.यावेळी पावडे बोलत होते.बैठकीला अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर (सोलापूर),चंद्रशेखर पाटील (बारामती),भाऊसाहेब इवरे (पायाभूत आराखडा),उदय कुलकर्णी (सातारा) यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीमध्ये प्रभारी प्रादेशिक संचालक पावडे यांनी उपविभागनिहाय कामकाजाचा आढावा घेतला.ते म्हणाले,की वीजबिलांच्या दुरुस्तीसाठी वीजग्राहकांना त्रास होतो.तसेच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कामाचा वेळ सुद्धा खर्च होतो.वीज जोडण्यांच्या मीटर रिडींगची माहिती महावितरणच्या वेबकन्सोलवर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. त्याचे दैनंदिन निरीक्षण करून ग्राहकांकडे बिल पाठविण्यापूर्वीच चुकीच्या वीजबिलांची दुरुस्तीची कार्यवाही करण्यात यावी.

कृषीपंपांचे रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी वीजचोरीविरोधात मोहीम तीव्र करावी तसेच उच्चदाब वितरण प्रणालीच्या (एचव्हीडीएस) माध्यमातून स्वतंत्र रोहित्रांद्वारे देण्यात येणाऱ्या कृषीपंपांच्या वीजजोडण्यांचा वेग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. वीजबिलांच्या १०० टक्के वसुलीला प्राधान्य देत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात यावा आणि वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही चोरीद्वारे वीज वापरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी असे निर्देश प्रभारी प्रादेशिक संचालक सुनील पावडे यांनी दिले.

या बैठकीला सहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) कीर्ती भोसले,सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) प्रदीप सातपुते,कार्यकारी अभियंता (प्रशासन) महाविर शेंडगे,उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे यांच्यासह बारामती मंडल तसेच सोलापूर व सातारा जिल्ह्यातील कार्यकारी अभियंते व उपविभाग कार्यालयप्रमुख,लेखा अधिकारी आदींची उपस्थिती होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या