पेटीएम केवायसी अपडेट करत असाल तर सावधान...

Image may contain: phone and screen
शिरूर, ता. 19 फेब्रुवारी 2020: पेटीएमला केवायसी अपडेट करण्यासंदर्भात मोबाईलवर अनेकांना एसएमएस येतात. संबंधित एसएमएस नागरिकांना येऊन त्यांच्या डेबिट कार्डची माहिती घेऊन ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. पुणे शहरात जानेवारीपासून 152 तक्रारी दाखल झाल्या असून, त्यामध्ये सुमारे 15 ते 17 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. तर, मागील दोन-तीन दिवसांत दररोज 10 ते 12 तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सावध राहा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


एसएमएसमधील नमूद क्रमांकावर कॉल केल्यास पेटीएम कंपनीतून बोलत आहे, असे सांगून आपला विश्वास संपादन करून पेटीएम केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने हे क्रिमिनल्स आपल्या डेबिट कार्डची माहिती व ओटीपी घेऊन आपले बॅंक खाते संपूर्ण साफ करत आहेत. पेटीएम वापरणारा वर्ग शिक्षीत असूनही असे प्रकार वाढत आहेत. नागरिक सहज आपल्या क्रेडिट, डेबिट आणि बॅंक खात्याची माहिती अनोळखी व्यक्तींना फोन वरुन देत आहेत. समोरील व्यक्तींनी पाठवलेली कोणतीही लिंक ओपन केल्यास बॅंकखात्यातील पैसे समोरील व्यक्तीच्या खात्यात वर्ग होतात.


पेटीएम कंपनी अशा प्रकारचे कोणतेही मेसेज पाठवत नाही, तसेच फोन करत नाही. यामुळे सावध होऊन कोणत्याही प्रकारच्या मेसेज किंवा फोन कॉलला बळी पडू नका. पूर्वी बॅंकेतून बोलतोय असे सांगून खात्याची गोपनीय माहिती घेऊन फसवणूक केली जायची. तसाच हा प्रकार आहे, असे सायबर पोलिस स्टेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या