शिरूर तहसीलदारांची हेरगिरी करणारा गजाआड...

Image may contain: outdoor
शिरूर, ता. 19 फेब्रुवारी 2020: शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांच्या घराची हेरगिरी व हल्ला करणाऱ्या आठपैकी एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, इतर सात आरोपी अद्याप फरार असल्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले. या हल्ल्यातील वाळूतस्करांच्या चार व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या ऍडमिनवरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.अशोक सहादु वाखारे (रा. वाखारवाडी, हिंगणी, ता. श्रीगोंदा, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याचे इतर साथीदार अद्याप फरार आहेत. शुक्रवारी (ता. 14) पहाटे साडेतीन वाजता शेख या कारवाईसाठी जात असताना त्यांच्या घराची हेरगिरी करून त्यांना दमदाटी करून तुम्ही कारवाईला कसे जाता बघतो तुमच्याकडे, असे म्हणून त्यांच्या पतीवर हल्ला करून पळून जाणाऱ्या वाळू तस्कर यांच्या या मुजोरीमुळे संपूर्ण तालुक्‍यात खळबळ उडाली होती.


हे गुन्हेगार शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांच्यासह प्रांताधिकारी, नायब तहसीलदार खेडचे तहसीलदार यांच्या मोबाइल लोकेशनची हेरगिरी करत होते. अनेकवेळा लैला शेख यांच्या गाडीचा पाठलागही शिरूर, श्रीगोंदा, पारनेर, दौंड, हवेली परिसरातील वाळूमाफिया करीत होते. यासंदर्भात शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर पोलिसांना याबाबत तहसीलदार यांनी कळविले होते; परंतु यावर कारवाई न झाल्याने त्यांच्या घरावर आठ वाळू तस्करांनी हल्ला केला होता.


तहसीलदार लैला शेख यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद देताच वाळू तस्कर गायब झाले होते. सोमवारी (ता. 17) रात्री उशिरा पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश जगदाळे व पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र मांडगे यांनी यातील अशोक वाखारेचा माग काढून पकडले. त्यामुळे तहसीलदार शेख यांच्यावर हल्ला करणारे आरोपी लवकरच ताब्यात येतील असे पोलिसांनी सांगितले.


तहसीलदार शेख यांच्यावरील हल्ल्याचे सूत्रधार व सापडलेल्या मोबाइलमधील वाळूमाफियांची ग्रुप व त्यावेळेस या वाळूमाफियांची संपर्कात असणारे इतर वाळूमाफिया यांचा तपास करण्यासाठी सापडलेल्या मोबाइलवरचे रेकॉर्ड तपासून संबंधितांवर कारवाई होणार असून, या मोबाइलमध्ये असणारे चार वाळू माफियांचे व्हॉट्‌सऍप ग्रुप यांच्या ऍडमिन वरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या