शिवजयंती निमित्त भगवा झेंडा खरेदीसाठी गर्दी...

पिंपरी चिंचवड, ता १९ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड शहरात शिवजयंतीचा तरुणाईमध्ये मोठा उत्साह पाहण्यास मिळत आहे.अनेक ठिकाणी शिवजयंतीची जोरात तयारी सुरू आहे.शहरात भगव्या झेंड्यांची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी होत आहे.शहरात विविध संस्था,संघटनांच्या वतीने शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे.त्या पार्श्‍वभूमीवर ऐतिहासिक,धार्मिक तसेच सामाजिक उपक्रम होणार आहेत.मागील आठवड्यापासूनच शहरात शिवजयंती निमित्त कार्यक्रम सुुरू असून अनेक ठिकाणी कीर्तन,शाहिरी पोवाडे,प्रवचन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.व्याख्यानांना तरुणाईची गर्दी होत आहे.

शिवजयंती निमित्त कार्यालये,घरे यासह दुचाकी व चाकचाकी वाहनांवर झेंड लावण्यात येत आहेत.अनेक मंडळांतर्फे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तर घरामध्ये तसेच कार्यालयात शिवरायांची प्रतिमा लावण्यासाठी खरेदी करण्यात येत आहे.तरुणाईमध्ये शिवरायांचे चित्र असलेल्या टि-शर्टची क्रेझ दिसून येत आहे.शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी शहरातील तरुणाईकडून आपल्या दुचाकी,चारचाकी वाहनांवर भगवे ध्वज लावण्यात येत आहेत.तसेच मोठ्यात मोठा ध्वज वाहनावर डौलाने फडकावा यासाठी चढाओढ पहायला मिळत आहे.

शहरातील बाजारपेठाही भगव्या रंगात रंगल्याचे चित्र पहायला मिळत आहे.बाजारात शिवजयंतीसाठी भगवे झेंडे,शिवाजी महाराजांची मूर्ती व त्यांचे छायाचित्र असलेले झेंडे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.मागील ३ दिवसांत जवळपास २ हजार झेंड्यांची विक्री करण्यात आल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.यंदाही शिवरायांची मूर्ती व भगवे झेंडे यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.पिंपरी कॅम्पसह भोसरी,चिंचवड,चिखलीसह विविध भागांत विक्रेत्यांनी बाजारात झेंडे,मूर्ती व अन्य वस्तूंची दुकाने थाटली आहेत.झेंडे घेण्यासाठी तसेच शिवाजी महाराजांच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी तरुणाईसह शहरवासीयांची गर्दी होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या