जांबूतमधील सहा शेतमजुरांना आता मदतीची गरज...

Image may contain: outdoor
जांबूत, ता. 27 फेब्रुवारी 2020 : जांबुत (ता. शिरूर) येथील चौधरीवस्तीतील एका घराला लागलेल्या आगीत सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे शेतमजुरी करणाऱ्या 6 मजुरांच्या झोपड्या मंगळवारी (ता. 25) जळून खाक झाल्या. सुदैवाने यात जीवित हानी जरी झालेली नसली तरी या आगीत 6 शेतमजुरांचे सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
येथील थोरात वस्तीनजीक प्रकाश चव्हाण यांच्या शेतात झोपड्या करून वास्तव्यास असणाऱ्या गणेश दुधडे, संतोष पारधी, अभिमन्यू अतोळे, सूनील दुढदे, बबन खोमणे, अभिजित कोकणे शेतमजुरांच्या 6 झोपड्या मंगळवारी सायंकाळी 4 च्या सुमारास झालेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेत जळून खाक झाल्या. या घटनेत या सर्व शेतमजुरांचे संसार उपयोगी पूर्ण साहित्य, ६ गॅस टाक्या, गॅस शेगडी, टीव्ही, कपडे, पैसे, मोटारसायकल, 6 सायकली पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. गॅस लिकेज मुळे हे जळीत झाले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, आगीच्या या दुर्दैवी घटनेत 6 लाख रुपयांचे नुकसान झाले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या आगीमुळे ही सहा कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.स्फोट झाला त्यावेळी घरातील लहान मुलांसह सर्वजण शेतात काम करत होते. दुपारी सव्वाचारच्या सुमारास एका घरातून धुराचा लोट येऊ लागला. ते पाहण्यासाठी हे शेतमजूर धावले. त्या वेळी घरातील एका सिलिंडरचा स्फोट झाला. त्यातून या सहा पत्र्याच्या घरांना आग लागली. प्रत्येक घरात सिलिंडर
असल्यामुळे आग आणि स्फोट होऊ लागल्याने आग आटोक्‍यात आणण्यासाठी अडचण निर्माण झाली. परिसरातील ग्रामस्थांनी आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मोलमजुरी करणारी ही कुटुंबे अक्षरशः रस्त्यावर आली आहेत. या कुटुंबांना आर्थिक मदतीची गरज आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या