सरपंचपदाचे आरक्षण काय निघणार याकडे सर्वांच्या नजरा...

Image may contain: text that says 'सरपंच'
मांडवगण फराटा, ता. ७ मार्च २०२० (प्रमोल कुसेकर): शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे वार्ड निहाय आरक्षण जाहीर झाल्याने गावोगावी राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे.परंतु,सर्वांच्या नजरा सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लागल्या आहेत.सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले की,गावोगावी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वातावरण नक्कीच तापणार असल्याचे दिसून येत आहे.जुलै अखेरपर्यंत मुदत संपत असलेल्या शिरूर तालुक्यातील तब्बल ७३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.त्यामुळे सर्वत्र निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत.युती सरकारच्या काळात फडणवीस सरकारने जुलै २०१७ मध्ये थेट सरपंच निवडीचा निर्णय घेतला होता.सरपंच पदाची निवडणुक थेट जनतेतून होती.परंतु महाविकास आघाडी सरकारने २८ जानेवारीच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरपंच निवड रद्द करून ग्रामपंचायत सदस्यांच्या मतदानाद्वारे सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला.जनतेमधून सरपंच पदाची निवडणूक रद्द करून परंपरागत निवडून आलेल्या सदस्यामधून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे गेली ५ वर्षे सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या पुढाऱ्यांमध्ये "कभी खुशी कभी गम"अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.परंतु, स्वतःला सरपंच होण्यासाठी प्रयत्न करणारी नेतेमंडळी आता आपल्या विचारांचे पॅनल निवडून कसे आणता येईल यासाठी व्युहरचना करण्यात दंग झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.

शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील इनामगाव, पिंपळसुटी, शिरसगाव काटा, बाभुळसर बुद्रुक, वडगाव रासाई, कुरूळी, नागरगाव, आंधळगाव, कोळगाव डोळस, सादलगाव, गणेगाव दुमाला, आलेगाव पागा ,तांदळी आदी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.तर काही पॅनल प्रमुखांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांना घेऊन पर्यटनही घडून आणले आहे.गेली ५ वर्षे झालेली स्वयंघोषित नेते मंडळी लग्न, वाढदिवस, यात्रा, जत्रा ,सप्ताहाच्या  माध्यमातून संपर्क करण्याचा आटापिटा करू लागल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत आहे.तसेच सरपंच पदाच्या निवडणुकीत मनासारखे आरक्षण न पडल्याने आपल्या पत्नीसाठी अथवा इतर प्रभागातून निवडणूक लढवता येईल का याची चाचपणी इच्छुकांनी सुरू केलेली दिसून येत आहे.


जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीची निवडणूक जुलै महिन्यामध्ये होत आहे.ग्रामपंचायतचा कारभार ताब्यात घेण्याची मनिषा असलेल्या गाव कारभार करणाऱ्या पॕनेल प्रमुखांची भावी सदस्य शोधण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार कि ग्रामपंचायत सदस्यांमधून याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.परंतु, राज्य शासनाने विधीमंडळामध्ये सरपंचपदाची निवडणूक ही सर्वसाधारण सदस्यांमधून होणार असल्याचा ठराव संमत केला आहे.त्यातच गावांमधून प्रभाग निहाय आरक्षणही जवळपास निश्चित झाले आहे.हरकतीची तांत्रिक बाब वगळता वार्ड निहाय आरक्षणामध्ये फारसे बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने आरक्षणामध्ये सुमारे ५० टक्के महिला तसेच खुला वर्ग इतर मागावर्गीय समाजातील सदस्य व अनुसुचित जाती जमातीतील सदस्य असल्याने या सर्व वर्गामधून आपल्याला दमदार सदस्य कसे मिळतील याचा शोध आता पॕनेल प्रमुखांनी सुरु केला आहे.

विरोधकांना शह कसा देईल असे दमदार उमेदवार आपल्या पॕनेलमध्ये असावेत यासाठी आतापासूनच पॕनल प्रमुखांनी डावपेच आखण्यास सुरवात केली आहे.हस्ते परहस्ते भावकीतून व नातेवाईकांच्या माध्यमातून गळाला न लागणाऱ्या सदस्यांना आपल्या पॕनेलमधून उभे राहण्यासाठी आता निरोप पाठविण्याचे काम सुरू झाले आहे.तसेच आपण निवड करीत असलेल्या सदस्यांवर विरोधक काही डाव तर टाकत नाही ना यावर या पॕनेल प्रमुखांचे कडेकोट लक्ष आहे.पॕनेल प्रमुख व संभाव्य उमेदवार नागरिकांना आवर्जुन नमस्कार घालत आहेत.पाराच्या कट्ट्यावर व हाॕटेलमध्ये मतदारांना आवाज देऊन चहा-पाणी व नाष्टा करण्यासाठी आग्रह केला जात असल्याने नागरिकांनाही आता ग्रामपंचायतची निवडणूक जवळ आल्याचे संकेत मिळत आहेत.यामुळे पारावर गप्पांचा फड रंगत आहे.म्हणूनच पॕनेल प्रमुख यामधून आपला विरोधक कोण उमेदवार देणार याचा अंदाज घेत आहेत.


ज्या गावांच्या यात्रा-जत्रा आहेत त्या गावांमध्ये आवर्जुन पॕनेल प्रमुख जेवणाचे आमंत्रण देत आहेत.पॕनेलप्रमुख आपले विरोधक कुठल्या वाडीत,कुठल्या  गावात गेले आणि कुठे प्रवास करत आहे याच्यावर लक्ष ठेवू लागले आहेत.आपले विरोधक कसे वाईट व त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये कसे वाईट काम केले आणि भ्रष्टाचार केला याची जाहीर बातमी आता ते लोकांमध्ये पेरू लागले आहेत.या पॕनेलप्रमुखांचे प्रमुख हस्तक गोपनीय कामाला लागले असून मिळालेली गोपनीय माहीती राञी पोहोच करण्याचे काम जबाबदारीने पार पाडत आहे.पॕनेलप्रमुख संभाव्य उमेदवारांची आर्थिक ताकद व त्यांचा जनसंपर्क याची काटेकोरपणे माहीती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.यामुळे पॕनेलप्रमुख आपल्या पॕनेलच्या बांधणीसाठी व्यस्त असल्याचे चित्र सध्या गावागावात दिसत आहेत.
   
No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या