शिरूर तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; पण...

शिरूर, ता. 13 मार्च 2020 : शिरूर तालुक्‍यात कोरोनाचा एकही रुग्ण नसून, लक्षणांमुळे तपासणीसाठी आलेले संशयितही कोरोनाबाधित नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाबाबत तालुक्‍यातील सर्व वैद्यकीय व्यावसायिक आमच्या संपर्कात आहेत. प्रत्येक गावातील इत्थंभूत माहिती संकलित करून दक्षता उपाययोजना सुरू केल्या आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी येथील डॉक्‍टरांच्या बैठकीत दिली.


शिक्रापूर परिसरात कोरोनाचा संशयित असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. याच पार्श्‍वभूमीवर स्पंदन मेडिकल असोसिएशन तसेच शिक्रापुरातील 55 वैद्यकीय व्यावसायिकांना बोलावून डॉ. आर. डी. शिंदे तसेच शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. वैजनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना दक्षता बैठक घेत माहिती दिली.


गर्दीचे कार्यक्रम नियंत्रित वा रद्द करण्याच्या सुचना...
कोरोनाच्या प्रसाराला वेळीस पायबंद घालण्याच्या उद्देशाने गर्दी होणारे कार्यक्रम पुढील काही दिवसांसाठी नियंत्रित वा रद्द करण्याच्या सुचना आरोग्य विभागाकडून आल्याबरोबर जिल्हा पोलिस अधिक्षकांना तसे पत्र नुकतेच शिक्रापूर पोलिसांकडून देण्यात आले. याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकारी दोघे मिळून पुढील काही दिवसात गर्दी नियंत्रणाबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता येथील बैठकीत पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी व्यक्त केली.


नेटक-यांनो सावधान..

या भागातील एका युवकाबाबत कोरोना संशयित म्हणून सोशल मीडियात व्हायरल झाल्याने संबंधित युवकाने आपली बाजू टेक्स्ट मेसेज टाकून स्पष्ट केली. वास्तविक अशा रुग्णांची माहिती उघड होवू नये असा निती-संकेत आहे. मात्र, असे करणे संबंधितांना त्रासदायक होत असल्याने असे मसेजेस फॉरवर्ड केल्यास अशा व्यक्ति तसेच ग्रुप अ‍ॅडमिनवर आयटी अ‍ॅक्ट व बदनामीचा गुन्हा दाखल करणे शक्य असल्याचे यावेळी शेलार यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या