मंगलदास बांदल यांची 4 तास चौकशी; शिवाय...

पुणे, ता. 14 मार्च 2020 (PoliceKaka): पुण्यातील प्रसिद्ध सराफाला व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन 50 कोटींची खंडणीची मागणी केल्याप्रकरणात संशयाच्या भोवर्‍यात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची चार तास चौकशी करण्यात आली. यापुढेही त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे. गुन्ह्याच्या अनुशंगाने बांदल यांचा जबाब नोंदविण्यात येत आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिली.


बांदल यांना पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात शुक्रवारी बोलविण्यात आले होते. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. बच्चन सिंग म्हणाले, बांदल यांच्या विरूद्ध यापूर्वीही फसवणूकीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याचबरबरोबर बांदल यांनी खंडणी मागितल्याचाही गुन्हा केला आहे. त्यापैकी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयाने निकाल दिला आहे. याप्रकरणी बांदल यांची चौकशी सुरू आहे. जबाबनोंदणी केली जात आहे.दरम्यान, पुण्यातील सराफाला 50 कोटी रुपयांची खंडणीच्या प्रकरणात पोलिसांनी आशिष हरिश्चंद्र पवार (वय 27, रा. लक्ष्मीनगर, शाहू वसाहत, सहकारनगर), रूपेश ज्ञानोबा चौधरी (वय 45, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर) आणि रमेश रामचंद्र पवार (वय 32, रा. प्रेमनगर वसाहत झोपडपट्टी, मार्केटयार्ड) तसेच संदेश वाडेकर यांना अटक केली आहे.


पोलीसांनी प्रथम तिघांकडे चौकशी केल्यानंतर सराफाकडे वाहन चालक म्हणून काम करणार्‍या संदेश वाडेकर याचे नाव समोर आले होते. त्यावरून पोलिसांनी त्याला गुरुवारी रात्री अटक केली. त्याचवेळी बांदल यांचे नाव समोर आले होते. त्यांनाही गुरूवारी चौकशीसाठी बोलविल्यानंतर पुन्हा शुक्रवारी बोलविण्यात आले होते. त्यांची पुन्हा चौकशी केली जाणार आहे.


दरम्यान, मंगलदास बांदल यांची व सराफाची टिळक रस्त्यावरील एका कॅफेत भेट झाली होती. त्यावेळी रुपेश चौधरीही होता. बांदल यांनी एका व्यवहारासाठी आपली व सराफांची भेट झाली होती, असे पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे सहभाग निश्चीत होत नसल्याचे सांगितले आहे. गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते हे करत आहेत.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या