मंगलदास बांदल यांना 'या' तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Image may contain: 1 person
पुणे, ता. 23 मार्च 2020 (PoliceKaka): पुणे शहरातील सराफी व्यावसायिकास खंडणीप्रकरणी अटक केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपप्रदेश अध्यक्ष मंगलदास बांदल यांना न्यायालयाने एक एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच बांदल यांचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला.
या प्रकरणात आशिष हरिश्‍चंद्र पवार (वय 27, रा. लक्ष्मीनगर, शाहू वसाहत, सहकारनगर), रूपेश ज्ञानोबा चौधरी (वय 45, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर), रमेश रामचंद्र पवार (वय 32, रा. प्रेमनगर वसाहत झोपडपट्टी, मार्केटयार्ड) आणि संदेश वाडेकर या चौघांना पोलिसांनी आत्तापर्यंत अटक केली होती. तर शनिवारी रात्री बांदल यांना अटक केली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगलदास बांदल यांनी फिर्यादी सराफाला फोन करुन भेटण्यासाठी बोलावले होते. त्या वेळी रुपेश चौधरी त्याच्यासोबत होता. बांदल यांनी सराफाला तुमच्या जवळचे लोकच तुम्हाला त्रासदायक ठरणार आहेत. म्हणून येथून पुढे काही असेल, तर रुपेश चौधरीच माझ्यावतीने काम पाहील,' अशी ओळख फिर्यादीस करुन दिली होती. त्यानंतर सराफाला भेटलेला आशिष पवार हा रुपेश चौधरीच्या नावाने फिर्यादी खंडणीची मागणी करत होता. या प्रकरणी पोलिसांनी बांदल यांना अटक केली होती. बांदल यांच्यावर खंडणी, फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यातील अश्‍लील व्हिडीओ क्‍लीप त्यांच्याकडे असल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील हेमंत मेंडकी यांनी केली. फिर्यादीच्या वतीने ऍड. पुष्कर दुर्गे यांनी काम पाहिले.


दरम्यान, बचाव पक्षातर्फे मंगलदास बांदल यांच्या जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. सरकारी पक्षातर्फे ऍड.मेंडकी यांनी जामीन फेटाळण्याची मागणी केली. प्रथमदर्शनी त्यांनी गुन्हा केल्याचे दिसून येत आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. या स्थितीत जामीन देणे योग्य ठरणार नसल्याच्या युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन फेटाळला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या