रेशनींग दुकानावर आजपासुन धान्य वाटप


न्हावरे, ता. १ एप्रिल २०२० (योगेश मारणे):  शिरूर-हवेतील गरजू व सर्वसामान्य  जनतेला अन्नसुरक्षा व अंत्योदय योजनेअंतर्गत १ एप्रिल पासून रेशनिंग दुकानांवर धान्य वाटप होणार आहे.त्याचप्रमाणे १० एप्रिलनंतर पुढील दोन महिन्यांसाठी धान्याचे वाटप होणार आहे. अशी माहिती शिरूर-हवेलीचे  आमदार, ॲड.अशोक पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलताना दिली.त्यामुळे गरजू व सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे.


तसेच शिरूर-हवेलीतील सर्व नागरिकांना आमदार ॲड.अशोक पवार यांनी कटाक्षाने घरी राहण्यासाठी विनंती केली आहे.स्टे-होममुळे आपण करोना सारख्या भस्मासुरापासून सुरक्षित राहू शकतो.असा  विश्वास आमदार पवार यांनी यावेळी मतदार संघातील जनतेशी बोलताना व्यक्त केला.शासन व प्रशासन जनतेच्या हितासाठी करोनापासून बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी व युवकांनी प्रशासनाला व पोलिसांना लॉक डाऊनच्या काळात सहकार्य करावे.त्याचप्रमाणे युवकांनी विनाकारण पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये.तसेच गाड्यांवर फिरू नये.असेही आमदार पवार यांनी फेसबुक लाईव्हवरून बोलताना सांगितले.

           
आज पासून रेशनिंग दुकानांवर अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्रती व्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ धान्य वाटपास सुरुवात होणार आहे. हे धान्य वाटप एप्रिल महिन्यासाठी आहे. त्याचप्रमाणे अंत्योदय योजने अंतर्गत (पिवळे कार्ड) एका कार्डवर ३५ किलो धान्य वाटप होणार आहे. यामध्ये २० किलो गहू आणि १५ किलो तांदूळ असे वाटप होणार आहे. तसेच या कार्डवरील प्रत्येक व्यक्तीस फक्त एप्रिल महिन्यासाठी ५ किलो तांदूळ मोफत मिळणार आहे. तर १० एप्रिल नंतर एकाचवेळी पुढील दोन महिन्यांसाठी धान्य वाटप होणार आहे. असेही आमदार पवारांनी यावेळी सांगितले.

           

पुढे बोलताना आमदार पवारांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा मिळावा म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध महानंदाने खरेदी करुन दूध भुकटी प्रकल्प सुरू करावा.अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती.या मागणीला शासन स्तरावरून सकारात्मकता दर्शवण्यात आली असल्याचे आमदार पवारांनी सांगितले.MIDC परिसरातील कामगारांची तसेच रस्त्याने पायी जाणाऱ्यांची  राहण्याची व जेवणाची सोय शिरूर आणि कारेगाव या ठिकाणी केली आहे.त्यामुळे अशा व्यक्तींनी आहे त्या ठिकाणीच राहावे असे,आवाहन आमदार ॲड अशोक पवार यांनी केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या