पोलिस अधीक्षकांनी घेतले ओसरीवर जेवण अन्...

शिरूर, ता. 11 एप्रिल 2020 (सतीश केदारी / पोलिसकाका) : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर पोलिस अहोरात्र नागरिकांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उभे आहेत. पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलिस दलाला सर्वतोपरी खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.पंधरा दिवसांपूर्वी शिरूर तालुक्‍यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळला; तर नुकताच बारामतीत कोरोनाने एकाचा मृत्यु झाला. त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. या पाठोपाठ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून कोरोना संशयित रूग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अधीक्षक पाटील यांनी गर्दी टाळण्याचे, खरेदीच्या नावाखाली नाहक घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.


विनाकारण रस्त्यावर फिरणारांना पोलिसी खाक्‍या दाखविण्याबरोबरच; आता परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि कायदा - सुव्यवस्थेची चाचपणी करतानाच; पोलिस बंदोबस्त आणखी कडेकोट करण्यासाठी तालुका स्तरीय गावांबरोबरच; सर्व मोठ्या गावांतून पोलिस संचलन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विनाकारण रस्त्यावर गर्दी केल्यास गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्यांनी पोलिस दलाला दिल्या आहेत.

स्वतः पाटील हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत. बंदोबस्तकामी जिल्ह्याच्या विविध भागात फिरताना, ते स्वतः सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करीत आहेत. "कोरोना' च्या मुकाबल्यासाठी "सोशल डिस्टन्सिंग' अत्यंत महत्वाचे असून, त्यासाठी गेले काही दिवस दुपारचे जेवण ते घरात न घेता घराच्या ओसरीवरच घेत आहेत. दिवसभर बंदोबस्तकामी फिरावे लागत असल्याने, खबरदारी म्हणून हे करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. गर्दी टाळण्याबाबत त्यांनी आग्रही आवाहन केले आहे.दरम्यान, पाटील हे सोशल डिस्टनिंगचा नियम पाळत ओसरीवर जेवण करत असतानाही छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहेत. पोलिसांवर नागरिक शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. शिवाय, पाटील यांच्या छायाचित्रांवर प्रतिक्रिया नोंदवताना ते काळजी घेत आहेत आपण कधी घेणार असा प्रश्न विचारला जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या