शिरूरजवळ नाकाबंदीमुळे अनेकजण अडकले पण...

शिरूर, ता. 23 एप्रिल 2020: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे अनेकजण अडकून पडले आहेत. लॉकडाऊनची मुदत 3 मे पर्यंत वाढवल्यामुळे अनेक कामगार पायी चालताना दिसत आहेत. शिरूरजवळ नाकाबंदीमुळे अनेकजण तेथे अडकले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.


महिनाभरापासून लॉकडाउन झाल्याने अनेक कायम व कंत्राटी कामगारांना घरी बसावे लागले. १५ एप्रिलला लॉकडाउन उठेल या आशेवर अनेक कामगारांनी कसेबसे दिवस काढले. जवळ असलेली पुंजी खर्च करून चरितार्थ चालवला. परंतु उद्योग चालू न झाल्याने अनेक कामगारांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे बहुतांश कामगारांनी घराकडे धाव घेण्यास सुरवात केली आहे. पुणे-नगर रस्त्यानी कामगार पायी चालताना दिसत आहेत. त्यांच्याजवळ लहान मुले, पिशव्या घेऊन भर उन्हात चालताना पाहून अनेकांचे मन हेलावत आहे. सामाजिक भावनेतून अनेकजण मदत करत असले तरी ही मदत कमी पडताना दिसत आहे.


शिरूर शहराबाहेरून जाणाऱ्या (बायपास) पुणे-नगर रस्त्यावरून शिक्रापूर, रांजणगाव, कारेगाव बरोबरच मुंबई, ठाणे, पनवेल, उरण या भागातूनही कामगार विदर्भ, मराठवाडा, मध्यप्रदेशात जाताना दिसत आहेत. पण, सतरा कमानीच्या पुलाजवळील नाकेबंदीतून या कामगारांना पुढे नगर जिल्ह्याच्या हद्दीत सोडले जात नाही. यामुळे हे कामगार पुन्हा माघारी फिरून शिरूर शहर व परिसरातील मोकळ्या जागा, पडकी घरे, शेड या ठिकाणी आश्रय घेत आहेत. काही सामाजिक संघटनांनी त्यांच्या चहा नाश्‍त्याची व्यवस्था केली. मात्र, दोन वेळचे पुरेसे जेवण आणि नीटसा आसरा मिळत नाही. या कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहे.दरम्यान, प्रशासनाने नागरिकांची काळजी घेण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. आम्हाला घरी जाऊ दिले जात नसेल तर किमान पोटाला दोन घास मिळावेत, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या