शिक्रापूर येथील वेळ नदीवरील बंधारा तुडुंब भरला

तळेगाव ढमढेरे, ता. २३ (एन बी मुल्ला ): शिक्रापूर (ता.शिरुर) येथील वेळ नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा तसेच मिनी बंधारा ऐन उन्हाळ्यात चासकमानच्या आवर्तनामुळे भरला असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र वेळ नदीतील या पाण्याचा प्रवाह कमी होत असल्याने वेळ नदीवरील परिसरातील सर्व बंधारे भरतील की नाही याबद्दल नागरिकांनी साशंकता व्यक्त केली असून सर्व बंधारे भरेपर्यंत आवर्तन सुरू ठेवण्याची मागणीही केली आहे.

 
गेल्या महिनाभरापासून वेळ नदीवरील बंधारे कोरडे पडल्याने परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता होती.परंतु ऐन उन्हाळ्यात चासकमान आवर्तन वेळ नदीतून  सोडल्याने पाण्याची समस्या दूर झाली आहे. या आवर्तनाचा पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीसाठीही उपयोग होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


नियोजनानुसार चासकमानचे आवर्तन वेळ नदीतून वेळेत सोडल्यास शक्यतो पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत नाही.तसेच शेतीसाठी देखील या पाण्याचा उपयोग होतो. बंधाऱ्यातील पाणी सुमारे ३ आठवडे पुरत असते. चासकमानचे हे आवर्तन टेल पर्यंत व वेळ नदीवरील सर्व बंधारे भरेपर्यंत सोडण्याची तसेच आवर्तन बंद करताना पिण्याच्या पाण्यासाठी पुन्हा एकदा वेळ नदीतून पाणी सोडल्यास पूर्ण उन्हाळ्यात पाण्याची सोय होणार असल्याने हे परतीचे आवर्तनही सोडण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या