कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तहसीलदारांनी दिले 'असे' आदेश

शिरूर, ता. 28 एप्रिल 2020: शिरूर तालुक्‍यातील काही नागरिक, व्यापारी करोना बाधित क्षेत्रात पुणे, मुंबई व इतर ठिकाणी भाजीपाला, भुसार माल, इतर वाहतूक करून पुन्हा आपल्या गावी येत आहेत. अशा नागरिकांपासून आपल्या गावात करोना संसर्ग होण्याचा धोका असल्याने अशा नागरिकांना क्वारंटाइन करण्यात यावे, असे लेखी आदेश शिरूर तहसीलदार लैला शेख यांनी शिरूर तालुक्‍यातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक व पोलिस पाटील यांना काढले आहेत.करोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्‍यता लक्षात घेता त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना आखणे आवश्‍यक आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी 30 मार्च रोजी जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू केलेला आहे, असे तहसिलदार लैला शेख यांनी आदेशात म्हटले आहे.
या कालावधीत जीवनावश्‍यक वस्तू भाजीपाला, भुसार व इतर वाहतूक मुंबई, पुणे व इतर ठिकाणी करून काही व्यापारी, नागरिक पुन्हा आपल्या गावी परत येतात. अशा व्यापारी नागरिकांना आपण काळजीपोटी क्वारंटाइन करणे आवश्‍यक आहे. अशा व्यापारी, नागरिकावर आपण लक्ष ठेवून त्यांना वेळीच गावातील इतर नागरिकांशी संपर्क न होऊ देता क्वारंटाइन करण्यात यावे. अन्यथा त्यांच्यामुळे गावातील इतरांना करोना संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या बाबी गांभीर्याने घेऊन कारवाई करण्यात यावी, असे तहसीलदार लैला शेख यांनी आदेशात म्हटले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या