शिरूर तालुक्यातील लॉकडाऊन शिथील पण...


शिरूर, ता. 22 मे 2020:
शिरूर तालुक्यात लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. पण, त्यानंतरही नियमांचे पालन करावे लागणार आहे. शिरूर तालुका रेड झोनमधून आता ऑरेंज झोनमध्ये गेला आहे.


शिरूर तालुक्‍यात प्रतिबंध क्षेत्र सोडून इतर ठिकाणी आज (शुक्रवार) पासून सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व दुकाने उघडी राहणार आहेत. सोशल डिस्टन्स व गर्दी होऊ नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, याची अंमलबजावणी शिरूर शहर व तालुक्‍यासाठी नियमावली व सूचना जाहीर केल्याची माहिती तहसीलदार लैला शेख व नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.


शिरूर तालुका रेड झोनमधून आता ऑरेंजमध्ये आला असल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्‍लोसस बंद राहतील. तथापि दुरुस्त आणि ऑनलाइन शिक्षण यात सूट असणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील. फक्‍त तयार पदार्थांची घरपोच सेवा देणारे हॉटेल सुरू ठेवता येईल. पण, तिथे ग्राहकांना बसून जेवणे, मध्यपान इत्यादी सेवा देता येणार नाही. सर्व धार्मिक स्थळे, पूजेची प्रार्थनेच्या ठिकाणी नागरिकांसाठी बंद राहतील.


धार्मिक स्थळांवर गर्दी करण्यास नागरिकांना मनाई आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर कारणासाठी सामान्य नागरिकांना रात्री 7 ते सकाळी 7 या वेळेत घराबाहेर निघण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व प्रकारची शासकीय कार्यालय सुरू राहतील. नगरपालिका आणि ग्रामपंचायतीची कार्यालये सुरू राहतील. सर्व सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातील, याकडे लक्ष द्यावे.दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्रातील बाबींना मज्जाव करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने सुचवल्याप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्रात फक्‍त जीवनावश्‍यक दुकाने सुरू असतील. प्रतिबंधित क्षेत्रात बॅंक, दवाखान्यासहित सर्व प्रकारच्या अस्थापना बंद राहतील. तळेगाव ढमढेरे, कारेगावमधील माळवाडी परिसर, शिवतक्रार म्हाळुंगी, टाकळी भीमा, कवठे येमाई ही क्षेत्रे त्यापुढील नमूद तारखेपासून 14 दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे.

शिवतक्रार म्हाळुंगीत ज्येष्ठाला बाधा...
शिवतक्रार म्हाळुंगी येथे एकाच घरातील आणखी एका ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती तळेगाव ढमढेरे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी २५ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली असून त्याच्यावर पुणे येथे उपचार चालू आहेत. युवकाच्या संपर्कातील सात लोकांना आरोग्य विभागाने क्वारंटाइन केले होते, त्यापैकी सहा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, त्याच घरातील ७५ वर्षीय नागरिकास कोरोनाची बाधा झाल्याचा खासगी रिपोर्ट आला आहे. त्यांच्यावर पुणे येथील नवले हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या