पराक्रमी धर्मवीर संभाजी महाराज - वढू बुद्रुक

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीदिनी (२२ मार्च) दर वर्षी वढू येथे कार्यक्रम होत असतात. संभाजी महाराजांच्या प्रेरक जीवनकार्याविषयी...

संभाजी महाराजांचे प्रेरणादायी बलिदान
संभाजीराजांचा जन्म १४ मे १६५७ ला पुरंदर येथे झाला. इ. स. १५५६ मध्ये कनकगिरीच्या वेढ्यात मारले गेलेले आपले थोरले बंधू संभाजीराजे यांचेच नाव युवराजांना देण्याचे महाराजांनी ठरवले. शिवाजी महाराज स्वराज्य वाढविण्यासाठी अनेक ठिकाणी मोहिमा आखत असत. त्याचा लाभ लष्करी अनुभवाच्या दृष्टीने युवराजांना मिळत असे. युद्धकलेत आणि लष्करी डावपेचांत निपुण असलेल्या पित्याचे संभाजी महाराजांना मार्गदर्शन लाभत गेल्यामुळे ते युद्धकलेत तरबेज होऊ लागले. त्यांच्या युद्धकलेतील नैपुण्याबद्दल ऍबेकॅरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी वर्णन करतो... "शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाला हाताखाली दहा हजार सैन्यांचा मोठा विभाग दिला होता. हा राजपुत्र वयाने जरी लहान असला तरी शौर्य आणि धैर्य यांच्या बाबतीत आपल्या वडिलांच्या कीर्तीला शोभेल असाच शूरवीर आहे.' सैनिकदेखील संभाजीराजे यांना शिवाजी महाराजांइतकाच मान देत असत. त्यांच्या हाताखाली लढण्यात सैनिकांना मोठी धन्यता वाटे.

संभाजीराजे नऊ वर्षांचे असताना शिवाजी महाराजांसोबत औरंगजेबला भेटण्यासाठी गेले होते. तेथे शिवाजी महाराज व त्यांच्या साथीदारांना नजरकैदेत ठेवले. आग्रा येथून शिवाजी महाराज निसटले. त्यांनी संभाजी महाराजांना मथुरा येथे काशीनाथपंतांकडे ठेवले. तेथे ते सुमारे आठ महिने होते. काशीनाथपंतांकडून त्यांनी संस्कृत भाषा शिकून घेतली. पुढे त्यांनी संस्कृतमध्ये काव्यरचनाही केली.

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर त्यांनी संभाजी महाराजांवर एकेक जबाबदारी टाकण्यास सुरवात केली. त्यांची पन्हाळगडावर नियुक्ती करण्यात आली. तेथून बादशाही फौजांवर नजर ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. तेथे त्यांनी बुधभूषण हे संस्कृत काव्य लिहिले. शिवाजी महाराजांचे निधन तीन एप्रिल १६८० रोजी झाले. संभाजी महाराजांच्या अनुपस्थिती त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजी महाराज आजारी असल्याचे वृत्तही संभाजी महाराजांना देण्यात आले नव्हते, पण त्यांनी कोणत्याही वादात न पडता राज्यकारभार सुरू केला. बऱ्हाणपूरवर हल्ला करून त्यांनी औरंगजेबाच्या तावडीतून आपला प्रदेश सोडविला व स्वराज्यास जोडला. या विजयानंतर १६ जानेवारी १६८१ रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला.

शिवरायांनी संभाजी महाराजांवर अनेक वेळेस वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या. कधी दिवाणी काम, तर कधी मुत्सद्देगिरीची बोलणी; तर कधी युद्धाचीही. त्यांना दिलेली कामगिरी ते यशस्वीरीत्या पार पाडीत.

इ. स. १६८२ मध्ये औरंगजेबाने संभाजी महाराजांना विजापूरच्या आदिलशहाची मदत मिळू नये, म्हणून विजापूरच्या दिशेने शहाजादा आजमला मोठ्या सैन्यासह रवाना केले; तर अहमदनगरकडे रुहुल्लाखानाची रवानगी केली आणि नाशिक जिल्ह्यातील रामसेज किल्ला जिंकून घेण्यासाठी शहाबुद्दीन खानाचा सरदार पाठविला. रामसेज किल्ला ताब्यात घेण्याकरिता औरंगजेबने अनेक सरदार पाठविले, मात्र एकाही सरदारास तो किल्ला जिंकता आला नाही. मात्र या सर्व मोहिमेसाठी औरंगजेबाच्या तिजोरीतून खर्च होत होता व या सर्व प्रकारामुळे औरंगजेब संभाजीराजांवर चिडला. सगळीकडे कानावर आदळणाऱ्या अपयशाच्या बातम्यांनी त्याचा तोल ढळला व त्याने आपला किमॉंश (डोक्‍यावर घालायचे शिरोभूषण) दाणकन जमिनीवर आदळला आणि शपथ घेतली, "त्या संभाचा जीव घेतल्याशिवाय किंवा त्याला राज्यातून हाकलून दिल्याशिवाय मी किमॉंश परत डोक्‍यावर धारण करणार नाही.' औरंगजेबाची अशी अवस्था झाली ती संभाजीराजांच्या पराक्रमामुळेच.

१ फेब्रुवारी १६८९ या दिवशी शेख निजामाने संगमेश्‍वर येथे अचानक छापा टाकला. त्यात संभाजी राजे व कवी कलश हे दोघे जण कैद झाले. त्या वेळेस औरंगजेबाचा मुक्काम अकलूजला होता. त्याने तेथून हुकूम फर्माविला, की कैद्यांना पांडे पेडगाव येथील बहादूर गडाच्या छावणीत आणण्यात यावे. औरंगजेबाने राजांचे डोळे काढावयाची आणि कलशाची जीभ हासडायची आज्ञा दिली. कारवाई लगेच करण्यात आली. यानंतरही संभाजीमहाराज व कवी कलश यांना औरंगजेबाने खूप त्रास दिला. यानंतर औरंगजेबाने दाक्षी सहुल्लाखान याला राजांकडे पाठवून खजिने व इतर धनसंपत्ती मोघलांकडे देण्यास सांगितले. तसेच फितूर मोघल सरदारांची नावे सांगण्यात यावी, असेही संभाजीराजांना सांगण्यात आले. कमालीच्या स्वाभिमानी संभाजीराजांनी कोणतीही माहिती सांगण्यास नकार दिला आणि बेधडकपणे ते मृत्यूला सामोरे गेले.

औरंगजेबाने ११ मार्च १६८९ रोजी त्यांची हत्या केली. त्यांचा मृतदेह वढू बुद्रुक परिसरात टाकला. औरंगजेबाच्या दहशतीमुळे त्यांच्या मृतदेहाला कोणीही हात लावला नाही. वढू परिसरातील काही शूर मावळ्यांनी त्यांच्या मृतदेहाचे दर्शन घेतले. मृतदेहाला हात लावला. तेव्हापासून वढू गावातील काही ग्रामस्थांचे नामकरण शिवले असे झाले. त्याचबरोबर काही ग्रामस्थांनी त्यांचा तेरवीचा कार्यक्रम (भंडारा) केला. तेव्हापासून त्यांचे अडनाव भंडारे झाले. औरंगजेबाच्या सैन्याने ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना आडवले त्या गावाचे नाव आपटी असे पडले. काही ग्रामस्थांनी त्यांच्या मृतदेहाला फुले वाहून दर्शन घेतले. तेव्हापासून त्या गावाचे नाव फुलगाव पडले. भीमा, इंद्रायणी, भामा या नद्यांच्या संगमाजवळून संभाजी महाराजांना ओढीत आणले. तेव्हापासून त्यागावाचे नाव वढू पडले. त्याच ठिकाणी महाराजांच्या समाधीची निर्मिती करण्यात आली, अशी माहिती पुणे जिल्ह्यातील वढू, आपटी, फुलगाव येथील ग्रामस्थांच्या चर्चेतून मिळते.

संभाजी महाराजांच्या हत्येनंतर १८ वर्षे औरंगजेब स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी लढला, पण त्याला त्यात यश आले नाही. संभाजी महाराजांनी धर्मापुढे स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही. त्यांनी आपल्या कृतीतून धर्मप्रेमाचे उत्तम उदाहरण घालून दिले. संभाजी महाराजांच्या या अतुलनीय धैर्यामुळे आणि त्यांच्या बलिदानामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. महाराष्ट्रात प्रचंड अशी ताकद निर्माण झाली.

समाधीस्थळाचा इतिहास
फाल्गुन वद्य अमावस्येला (११ मार्च १६८९) वढूतील ग्रामस्थांनी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार केले. १७९९ पूर्वी राजांचे पुत्र छत्रपती शाहूराजे यांनी येथे पित्याचे वृंदावन बांधून नैवेद्य, धूप, बाग यासाठी व अन्नछत्रासाठी जमीन इनाम देऊन व्यवस्था केली.

संबंधित लेख

संबंधित बातम्या

  • 1