'आता मोराची मुखई...'

शिरूर तालुक्यामध्ये मोरांचे दर्शन विविध गावांमध्ये होऊ लागले आहे. "मुखई' हे आणखी एक गाव विकसित होत असून आत्तापर्यंत ऐतिहासिक आणि धार्मिक ओळख असलेल्या या गावाची ओळख आता "मोराची मुखई' म्हणून होऊ लागली आहे. गावात तब्बल पाचशेपेक्षा जास्त मोर असलेल्या या गावात कृषी पर्यटनही विकसित होत आहे.

आणखी एक कृषीपर्यटन स्थळ या निमित्ताने उपलब्ध होत असल्याने जिल्हात आता मोराची मुखई नव्याने मयुरदर्शनासाठी प्रसिद्ध होत आहे. राष्ट्रीय पक्षी मोरांसाठी शिरूर तालुक्‍यातील मोराची चिंचोली प्रसिद्ध आहे. गावकऱ्यांच्या मयुरप्रेमाणे मोराची चिंचोलीत मोरांची संख्या जिल्ह्यात सर्वांत विक्रमी आहे. मोरांच्या चिंचोलीशी साधर्म्य पाळणारे पण मुबलक पाण्याच्या उपलब्धतेमुळे अगदी कोकणचा "फील' देणारे गाव म्हणून हल्ली "मुखई' विकसित होत आहे.

वेळनदीचा विस्तीर्ण किनारा व चासकमानच्या उजव्या कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या पुरवठ्याने या भागात मोरांची संख्या वाढत चालली आहे. उसाचे फड, केळींच्या बागा, सीताफळ बागा, संत्री बागा, नारळाची बनं आणि मुख्य वाहतुकीच्या रस्त्यापासून कितीतरी आत नीरव शांततेचा परिसर असलेल्या या भागात तब्बल पाचशे पेक्षा जास्त मोर व लांडोर वास्तव्यास आहेत. गावकऱ्यांच्या प्रेमामुळे येथील मोरही चांगलेच माणसाळलेले आहेत.

मोरांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्धतेचा विचार करून गावात आता कृषी पर्यटनही विकसित होत आहे. मुखई गावापासून केवळ दीड किलोमीटर आत "निसर्ग कृषी पर्यटन स्थळ' नावाने जयसिंग येवले, राहुलकुमार येवले, भाऊसाहेब येवले व अमोल येवले आणि कुटुंबाने हे स्थळ विकसित केले आहे. भरगच्च नारळीच्या बनात मोरांची प्रत्यक्ष भेट, गावरान जेवण, एक एकर क्षेत्रातील तब्बल सात तलावांमध्ये नौका विहार, ट्रॅक्‍टर फेरी, बैलगाडी फेरी, मनसोक्त मासेमारी आणि केळी, संत्री, चिक्कू, डाळिंब, हुरड्यासह यथेच्छ बेत येथे अगदी कुणाही पर्यटकांनी सहज उपलब्ध असतो.

पुण्यापासून ५० किलोमीटरवर मयुरदर्शनासाठी जाणाऱ्या मयुरप्रेमींसाठी आता ३० किलोमीटर अलीकडेच मयुरदर्शनासह कृषी पर्यटनही शक्‍य असून, लवकर पर्यटकांसाठी आवश्‍यक त्या सुविधा ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीचे वतीने उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती सरपंच अतुल धुमाळ यांनी दिली.

- देवेंद्र पचंगे

संबंधित लेख

  • 1

अखेरची मत चाचणी... शेवटच्या टप्प्यात कोणाची हवा?
 शिवाजीराव आढळराव पाटील
 डॉ. अमोल कोल्हे
 अन्य