जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र मोराची चिंचोली...

सुर्य मावळतीकडे झुकू लागतो. मग वेध लागतात ते मोरांच्या दर्शनाचे. मयुर कट्ट्यावर अनेक मोर-लांडोर येतात. पिसारा फुलवून नाचू लागतात...अनेकजण मोबाईल काढून त्यांच्या वेगवेगळ्या मुद्रा मोबाईलमध्ये कैद करतात...

लॉकडाऊनच्या काळात घरात बसल्यामुळे अनेकजण कंटाळले आहेत. म्हणून निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आणि नियमांचे पालून करून मोकळा श्वास घ्यायलाच हवा. पुणे शहरापासून 50 किलोमीटरच्या अंतरावर असलेले मोराची चिंचोली गावामधील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र हे अनेकांना खुणावत आहे...

मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागल्यामुळे कुटुंबियांसह बाहेर फिरायला जाणे झाले नव्हते. पुणे शहरापासून जवळ आणि एका दिवसात परत येण्यासाठी ठिकाण शोधत असतानाच फेसबुकवर मित्राचे अनेक छायाचित्र पाहायला मिळाली. निसर्गाच्या सानिध्यातील आणि मोरांची विविध छायाचित्रे. मोरांची छायाचित्रे पाहून मन मोहून गेले. छायाचित्रे लाईक करून झाल्यानंतर मोराच्या चिंचोलीला जाण्याचा निर्णय झाला...

रविवाराची सकाळ... गुलाबी थंडी... शहराकडून प्रवास सुरू झाला तो निसर्गाच्या दिशेने. पुणे-नगर रोडवरून सुरू झालेला प्रवास शिक्रापूरमधील मलठण फाट्याकडून आतमध्ये वळाला. बुरुंजवाडी, गणेगाव, वरूडे आणि शेवटी मोराची चिंचोली. मोराची चिंचोली गावामध्ये प्रवेश करू लागताच हिरव्यागार शेतांमध्ये ठिकठिकाणी मोर दिसू लागले. गावामध्ये धार्मिक कार्यक्रम सुरू होता. भोंग्यांवरून छान आवाज परिसरात घुमत होता... मन कसे प्रसन्न झाले होते.

entry gate of jay malhar krushi paryatan

जय मल्हार कृषी पर्यटन केंद्राच्या प्रवेशद्वारात पोहोचलो. ऑक्सिजन लेवल चेक केल्यानंतर आणि सॅनिटाझर हातावर घेतल्यानंतर प्रवेश मिळाला. पर्यटन केंद्रात प्रवेश केल्यानंतर मोठ्या आपुलकीने वेलकम ड्रिंकने स्वागत झाले. पुढे चालू लागलो... विविध गोष्टी पाहायला मिळत होत्या. अनेकजण कुटुंबियांसह, मित्रांसह, मैत्रिणींसह आनंद लुटत होते. यामध्ये अगदी लहान चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. अनेकांचे चेहरे आनंदाने ओसंडून वाहात होते. हसत, खेळत आनंद लुटत होते...

Have the shower bath in morachi chincholi

मिसळीचा आनंद...
सकाळी नाष्ट्यासाठी गरमागरम आणि चवचदार अशी मिसळ... अनेकजण मिसळीचा आस्वाद घेत होते. पोटभर मिसळ खाल्ल्यानंतर गरमागरम असा चहा. भरपेट असा नाष्टा झाला की पुढे आनंद लुटण्यासाठी अनेकजण विविध ठिकाणी जात होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक नाचण्याचा आनंद घेत होते. कोणी स्विमिंग पुलामध्ये पोहत होते... लहान मुले तर जम्पींग जॅकवर उड्या मनसोक्त उड्या होते... पालक आपल्या चिमुकल्यांच्या मुद्रा मोबाईलमध्ये कैद करत होते.

Get refreshed in swimming pool at Morachi Chincholi

बैलगाडी, घोडागाडी, उंट, ट्रॅक्टरमधून अनेकांची सफारी सुरू होती. चिंचेच्या झाडांना चिंचा लागलेल्या... कोणी चिंचा तोडत होते. कोणी लहान मुलांसारखे झोपाळ्यावर बसून बालपणात रमून जात होते. सायकल रोपवे, झुलता पूल, झोका... घसरगुडी... ओढ्यातील पाण्याचा आवाज... निसर्ग म्हणजे काय असते ते अनुभवायला मिळत होते. पंचवीस एकरच्या परिसरात फिरत असताना विविध खेळ खेळत असतानाच मिसळ कधी जिरली ते कळतही नव्हते. मग वेळ होते ती दुपारच्या जेवणाची...

bullock cart ride in morachi chincholi

पुरणपोळी आणि मासवडी...
दुपारच्या जेवणामध्ये पुरणपोळी, मासवडी, चटणी, पापड, भाजी, आमटीसह विविध पदार्थ... भरपेट जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर डोळे हळूच मिटायला लागतात. पण, झोपायचे नाही... शिवाय, उंच झाडावर लटकावलेल्या भोंग्यांमधून राजेश खन्ना यांची सुपरहिट गाणी लागलेली... अनेकजण झाडाखाली बसून गप्पा मारतात. कोणी हळूच पडी मारताना दिसतात तर कोणी गप्पांचा फड रंगवतात. काही जण क्रिकेट खेळण्यात रमतात तर महिला फेर धरू लागतात. दुसरीकडे जादूचे प्रयोग रंगतात. पशू-पक्षी अनुभवायला मिळतात. वेळ पुढे-पुढे कसा जातो समजतही नाही....

enjoying meals in morachi chincholi

हुरडा पार्टी...
दुपारनंतर सुर्य कलायला लागतो. छान अशी सुर्यकिरणे पाहायला मिळतात. यानंतर पावले वळतात ती हुरडा पार्टीकडे. गरमागरम हुर्डा... त्याच्या सोबतीला विविध चटण्या... मक्याचे कणीस, गुळ, बोरे खायला मिळतात. निसर्गाच्या सानिध्यात येऊन किती-किती पदार्थ खायला मिळतात... यानंतर पुन्हा गरमागरम चहा आणि कॉफी तर आहेच. दिवसभर अगदी मनसोक्त पेटपुजा होत राहाते... दिवसभर आनंद लुटत असताना तेथील कर्मचारी हे किती काळजी घेतात याचा अनुभव तर येतोच...

mayur katta at morachi chincholi

मोरांचे दर्शन...
सुर्य मावळतीकडे झुकू लागतो. मग वेध लागतात ते मोरांच्या दर्शनाचे. मयुर कट्ट्यावर अनेक मोर-लांडोर येतात. पिसारा फुलवून नाचू लागतात...अनेकजण मोबाईल काढून त्यांच्या वेगवेगळ्या मुद्रा मोबाईलमध्ये कैद करतात... पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर जे समाधान मिळते ना अगदी तसेच पर्यटनाला आल्यानंतर मोरांचे दर्शन झाल्यानंतर येथे आल्याचे सार्थक होते, असेच म्हणेन...

watch the animals in morachi chincholi

जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात संपूर्ण दिवस कसा आनंदी वातावरणात पार पडला हे कळतही नाही. मग, वेध लागतात ते परतीचे... पुन्हा पावले प्रवेशद्वाराकडे वळतात. अनेकजण प्रवेशद्वारावर आठवणीचे छायाचित्रे कैद करतात. शिवाय, शेतामधील ताजा भाजीपाला खरेदी करू लागतात. मग, मोटारीमध्ये बसून बाय-बाय करत परतीचा प्रवास पुन्हा शहराकडे सुरू होतो. पण, लॉकडाऊनच्या काळात आलेले नैराष्य जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात गेल्यानंतर कधी जाते हे समजतही नाही... www.morachichincholi.com या वेबसाईटवर जाऊन बुकींग करा आणि नक्कीच या पर्यटन केंद्राला भेट द्या...

- संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com

Title: Jai Malhar Krushi Paryatan Kendra Morachi Chincholi Shirur
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे