बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन

श्रावणातील प्रत्येक मंगळवारी येणारी मंगळागौर, याच महिन्यातील सोमवारांचे शिवभक्‍तांना असलेले महत्त्व, नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी आणि शेवटी येणारा सण म्हणजे बैलपोळा व पिठोरी अमावस्या असे या महिन्यातील सणाचे चक्र तर सुरु असतेच, पण पाऊस पडत असल्याने हिरवागार शालू नेसलेला निसर्गही सणांचा आनंद द्विगुणित करत असतो.त्यातीलच एक जबाबदारी आणि प्रेमाची पवित्र भावना जपणारा आजचा सण म्हणजे रक्षाबंधन.

चंद्राला चंदन, देवाला वंदन, भाऊ बहिणीचं प्रेम म्हणजे रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतुट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे.श्रावण महिन्याला सणांचा राजाच म्हणावा लागेल.श्रावणातील प्रत्येक मंगळवारी येणारी मंगळागौर, याच महिन्यातील सोमवारांचे शिवभक्‍तांना असलेले महत्त्व, नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी आणि शेवटी येणारा सण म्हणजे बैलपोळा व पिठोरी अमावस्या असे या महिन्यातील सणाचे चक्र तर सुरु असतेच, पण पाऊस पडत असल्याने हिरवागार शालू नेसलेला निसर्गही सणांचा आनंद द्विगुणित करत असतो.त्यातीलच एक जबाबदारी आणि प्रेमाची पवित्र भावना जपणारा आजचा सण म्हणजे रक्षाबंधन.श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे.या विधीस 'पवित्ररोपण' असेही म्हणतात.भावाचा उत्कर्ष व्हावा आणि आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही या मागची मंगल भावना असते.

'राखी' ह्या शब्दातच 'रक्षण कर' हा संकेत आहे.राखी बंधनाच्या या सणातून बहीण भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो अशी प्रार्थना करते आणि भावाचे हृदय प्रेमाने जिंकून घेते.राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्‍तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्‍तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे.पराक्रम, प्रेम, साहस, मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृद्धिंगत करण्याची ही प्रथा अस्तित्वात आली आहे.आपल्या बहिणीने समाजात ताठ मानेने वागावे म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो.तर बहीण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही तर सर्व स्त्री जातीच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते.भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नाही तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे.तर सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणाऱ्या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहीण आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते.रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे होय.

कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे म्हणून बहीण भावाचं नातं खूप गोड आहे.राखीचा धागा हा नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे.या एवढ्याशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात.त्यांना भावनांचा ओलावा मिळतो व मन प्रफुल्लीत होते.एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात वा संस्कृतीत नाही.सामाजिक ऐक्‍याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्त्वाचे ठरतात.रक्‍ताच्या नात्याव्यतिरिक्‍त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो.ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्‍य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे.

द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला म्हणजेच (कृष्णाला) बांधलेला जरतारी शेल्याचा तुकडा, गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी, राजपूत राणीने एखाद्या राजाला पाठवलेले राखीचे ताट, श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा आजकालच्या लॉकडाऊनमुळे इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली ई-शुभेच्छापत्रसहित राखी काय या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे बहिणभावाचे परस्परांवरील प्रेम.लहानपणी खाऊ आणि खेळणी यांच्या वाटणीवरून, आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणारे ताई-दादा लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष भेटता येत नसले तरी आता परस्परांना ई-पत्र, फोन किंवा चॅटद्वारे भेटण्याचा व राखी पौर्णिमा एकत्र साजरा करण्याचा आनंद उपभोगत आहेत.रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे एक निमित्त आहे.

 

 

Title: Rakshabandhan is the festival of sacred brother sister
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे