सैनिकाची पत्नी... देशाची खरी हिरोईन

पतीच्या पाठीमागे संसार सावरणारी अर्धांगिनी

सैन्याच्या मागेसुद्धा ठामपणे आणखी एक शक्ती उभी असते.ज्याप्रमाणे प्रत्येक यशस्वी पुरुषांमाघे एका स्त्रीचा हात असतो मग ती आई, पत्नी व मुलगी असू शकते. सैनिकामागे असणारी ती शक्ती म्हणजे त्यांच्या पत्नी; अर्धांगिनी त्यांना शक्ती देत, घर, संसार सांभाळत उभ्या असतात. सैनिकांना निर्धास्तपणे देशाचे संरक्षण करता यावे म्हणून त्यांचे घर, कुटुंब यांच्यावर मायेची पाखर घालत, कणखरपणे प्रसंगांना तोंड देणाऱ्या या पत्नींची, त्यांच्या कामाबद्दलची माहिती आपल्यासारख्या नागरिकांना नसते.

सेनादल, हवाई दल आणि नौदल या देशाच्या संरक्षणाच्या तीन भरभक्कम बाजू आहेत. जमीन, आकाश आणि पाणी या तीन महाभूतांवर स्वपराक्रमाने, स्वबळावर स्वामित्व गाजवू पाहणारी, परकीय आक्रमणांना धैर्याने सामोरी जाणारी ही दले देशांच्या सुरक्षिततेसाठी, नागरिकांच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावत असतात. पण जवळून जर यांचे जीवन जाणून घेतले तर रम्य आणि सुरस असण्याऐवजी अनेक चित्तथरारक अनुभवांची, जीवावर बेतणाऱ्या संकटांची एक मालिकाच आहे, असे दिसते. सैन्यातील  शौर्याच्या कहाण्या आपण नेहमी ऐकतो. त्यांची बहादुरी, देशाविषयी जाज्वल्य प्रेम याचा सगळ्यांना अभिमान वाटतो.

परंतु या सैन्याच्या मागेसुद्धा ठामपणे आणखी एक शक्ती उभी असते.ज्याप्रमाणे प्रत्येक यशस्वी पुरुषांमाघे एका स्त्रीचा हात असतो मग ती आई, पत्नी व मुलगी असू शकते. सैनिकामागे असणारी ती शक्ती म्हणजे त्यांच्या पत्नी; अर्धांगिनी त्यांना शक्ती देत, घर, संसार सांभाळत उभ्या असतात. सैनिकांना निर्धास्तपणे देशाचे संरक्षण करता यावे म्हणून त्यांचे घर, कुटुंब यांच्यावर मायेची पाखर घालत, कणखरपणे प्रसंगांना तोंड देणाऱ्या या पत्नींची, त्यांच्या कामाबद्दलची माहिती आपल्यासारख्या नागरिकांना नसते. स्वत: मागे राहून, वेळप्रसंगी अनेक तडजोडी करीत आपल्या पतीच्या कार्यात मोलाची मदत करणाऱ्या जीवन संगिनी विषयी म्हणूनच मला काही सांगावेसे वाटते.

माझं एका सैनिकासोबत लग्न ठरल्यानंतर सैनिकी जीवनाविषयी फारशी काही माहिती नव्हती.तरी वडील आर्मीत होते परंतु आम्ही लहान असतानाच ते सेवा निवृत्त झाले त्यामुळे सोबत राहण्याचा योग आला नाही. सतत होणाऱ्या बदल्या, काही ठिकाणी कुटुंबाला घेऊन राहण्यात येणाऱ्या अडचणी, पतीला आदेश आल्यानंतर रजा रद्द करुन कधीही रात्री-अपरात्री ड्युटीवर जावे लागणे.या सर्वांशी मोठ्या धीराने सामना करावा लागतो. मुलांच्या संगोपनाची, शिक्षणाची जबाबदारी समर्थपणे पेलावी लागते. स्वत:च्या कामाच्या स्वरुपामुळे फार क्वचित भेटणारे वडील आणि त्यांची वाट पाहणारी मुले यांच्यातील संवादांचा पूल बांधण्याचा आटोकाट प्रयत्न करावा लागतो. पत्नी म्हणून आणि आई म्हणूनही तितक्याच जबाबदारीने वागावे लागते. मुलांना व्यवस्थित वळण लावण्यात, शिस्तीने धडे देण्यात जराही कुचराई करून जमत नाही. आजारी असो, सणवार असो की मुलांची शाळेत पॅरेन्ट्स मिटिंग असो सर्व ठिकाणी हजर राहून वेळप्रसंगी दोघांचीही भूमिका पार पाडावी लागते.

लग्नानंतर एक वर्षांत पतिसोबत जाण्याचा योग आला. आधी कुठेच आणि कधीच ना गेलेली मी आर्मी जीवना विषयी अनभिज्ञ होते. आपल्याला तिथली भाषा बोलता येईल का...? अपरिचित प्रदेशात करमेल का...? एकटीला हा संसार झेपेल का...? अश्या बऱ्याच अनुत्तरीत प्रश्नांचे काहुर माझ्या मनात दौडत होते. पाच महिन्याची चिमुकले बाळ घेऊन मी निघाले रुडकीच्या कडक उष्ण वातावरणात ट्रेनने प्रवास सुरू झाला. गरजेचे समान, गृहोपयोगी वस्तू आणि सोबत भल्या मोठ्या काळजीत निघालेल्या मला आधार होता तो "मै हूं ना" म्हणून स्वारीची खंबीर साथ. पोहोचताच आर्मीच्या वाहनाने क्वार्टर मध्ये गेल्यावर जीवात जीव आला. जेवनांचे शेजाऱ्याकडे आमंत्रण होते. घर आवरायला २/३ दिवस गेले. मग मात्र गावाकडील दूरचे लोक जवळ वाटू लागले. कोल्हापूर, बेळगाव, अकोले येथील काही मैत्रिणी झाल्या.त्यामुळे हिंदी ऐवजी मराठीतच संवाद चाले. हळू हळू आर्मीचे नियम, राहणीमान, सुरक्षा बाजारपेठ अश्या बाबीची माहिती मिळू लागली.

कुटूंब कल्याण केंद्र...
"आर्मी वेवज वेलफेअर ऑर्गनायझेशन" यांच्या नेतृत्वाखाली सर्व आर्मी कटक मंडळात महिलांच्या कल्याणासाठी केंद्र चालवले जातात. त्यामध्ये शिवण क्लास, संगणक क्लास, हस्तकला, डान्स क्लास, मुलांच्या शिक्षणासाठी शिकवण्या, खेळाची मैदाने यांसारखे उपक्रम नेहमी चालत असतात. कधी कधी स्वतःच्या मर्जीने तर कधी हुकुमाणेही क्लासला जावे लागते. घरी राहून चूल, मूल आणि स्वारीच्या पाऊलातून वेळ काढून आपल्यासाठी बरेच काही शिकण्यासारखे असते. शिवाय मैत्रिणीशी गप्पाची मेजवानी तर औरच. व्यासमध्ये बैसाखी सणाला पंजाबी ड्रेस स्पर्धेत आम्ही सर्वांनी सहभागी होऊन केलेला भांगडा आजही आठवतो. बॅडमिंटन च्या स्पर्धेत खेळाडू उपलब्द ना झाल्याने अचानक आयुष्यात पहिल्यांदाच रॅकेट पकडून संघाला विजय मिळवून देणारा क्षण असू की गणेशोत्सवात मोदकाची परात देऊन सर्वांना स्वदिस्ट मराठी मेवा  देने असू, कोणत्याही क्षेत्रात आपण स्वारीच्या खांद्याला खांदा लावून आहोत यामुळेच जणू फौजीची पत्नी असल्याचा गर्व वाटतो.

काही आठवणीतील प्रसंग...
आठवणींच्या स्मरण पटलावर असंख्य घटना आहेत ज्या मनाला कधी सुखद तर कधी दुःखद वेदना देतात. स्वारींची सेवा नेमणूक लेहलदाख येथे होती. बर्फाच्छादित डोंगराळ आणि अपुऱ्या सोई-सुविधांचा भाग असल्याने कधी कधी मोबाईल नेटवर्क १० ते १५ दिवस बंद पडून बोलणी होत नसे. आर्मीच्या फोनच्याही केबल तुटून संपर्क खंडित होई. सुरुवातीला खूप काळजी वाटे परंतु नंतर वारंवार असे झाल्यामुळे मनाला समजावून सवय लागून गेली होती. तसे आम्ही लग्न झाल्यापासून प्रत्येक महिन्याला भले मोठे १० ते १२ पानाचे पत्र लिहीत असू त्यामुळे तरी वारंवार वाचून वेळ निघून जात असे. खरच पत्रात आमची निम्मी भेट होत असे. वेळ मिळेल तेव्हा, आठवून, स्मृतीत येतील तसे आम्ही पत्रात लिहीत असू. अनेक दिवस, महिने अश्याच परिस्थितीत जात होते. ड्युटी साठी उंचीवरील भागात जात आहे असे सांगून परत १० दिवस फोन आला नाही. काळजी वाढत होती तसे मी परत परत पत्र वाचून मनाला धीर देत होते. काय करावे, कुणाला सांगावे, कळत नव्हते. १५ दिवस झाले, १८ दिवस झाले तरीही काहीच संपर्क होत नव्हता. दिवस भर फोनची वाट पहायची आणि रात्रीही झोप येत नसे की जेवणासाठी भूक लागत नसे. काहीही विचार मनात येत असत. मुलासोबत एकटीच रहात असल्याने मनातील वादळ सांगण्यासाठी कोणीही नव्हते. २० दिवसानंतर मात्र माझी डोकेदुखी वाढू लागली तसे मी आईला हकीगत सांगितली. तिला न राहवून ती माझ्या कडे राहण्यास आली. दोघीही एकमेकींसोबत समजूत घालवू लागलो.एकेक क्षण हिमालयासारखा प्रचंड वाटू लागला होता.

एक दिवस रात्रीचे जेवण करून झोपेच्या तयारीत असताना फोन वाजला आणि मोबाइलच्या वैब्रेशन सोबत माझे काळीज धडधडू लागले. फोन उचलून हॅलो म्हणण्याची हिंमत झाली नाही. ’हाय जाणू’ स्वारीचा आवाज ऐकून बांधाऱ्यातील पाणी मोकळे सोडावे तसे दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी नुसतेच ऐकत राहिले. त्यांनी घडलेली चित्त थरारक घटना सविस्तर सांगितली. अतिउच्च ठिकाणी भारत- चीन सीमारेषा पाहण्यासाठी गेले असताना त्यांना अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. जवळ काहीच सुविधा नसल्याने खच्चरवर नजीकच्या कॅम्प मध्ये आणण्यात आले.मुख्यालयाला कळवून हेलिकॉप्टरची मागणी केली परंतु वातावरण खराब असल्याने काही अंतरावर वाहनानेच घेऊन मग सुरक्षित स्थळी ऑक्सीजन देण्यात आला. परंतु तो पर्यंत बेशुद्ध झालो होतो. नशिबाने वातावरण मोकळे झाले आणि हेलिकॉप्टर त्वरित दाखल झाले. पेशंट ला घेऊन ते थेट लेह च्या मुख्य दवाखान्यात पोहोचले. डॉक्टरांनी लगेच सर्व तपासणी करून इलाज सुरु केला. थोड्या दिरंगाईने अनर्थ झाला असता असे डॉक्टरांनी सांगितले. नंतर 3 दिवसांनी सर्व व्यवस्थित झाल्यावर त्यांनी मला फोन केला.
घटना सांगूस्तोवर माझ्या डोळयातून पाणी वाहत होते, नाक गळत होते, आई तोंड साफ करत होती आणि मी नुसतेच ऐकत जय श्री रामाचे आभार मानत होते.
     
भारत भ्रमनाच्या या प्रवासात सैनिक पत्नी म्हणून भरपूर प्रवास केला, प्रदेश पाहिले, दुसऱ्या राज्यातील लोकांचे राहणीमान, वेशभूषा, सणवार सारख्या वेगवेगळ्या संस्कृती ची माहिती मिळाली. आज आम्ही सेवानिवृत्त आहोत परंतु आजही बऱ्याच परप्रांतातील मैत्रिणी स्नेह बंधनात आहोत. काही विशेष कार्यक्रमाला भेटी गाठी होतात, जुने दिवस आठवताना खळखळून हसण्यासोबत डोळ्याच्या कडाही ओल्या होतात. आयुष्यभर पुरतील इतक्या आठवणीसोबत जीवनातील कठीण प्रसंगी लढण्याची ताकत ही मिळते. जरी ४/६ महिन्याने सैनिकाला सुट्टी मिळत असेल, जरी सणावाराला सुखदुःखाला आम्ही एकमेकांच्या सोबत नव्हतो, जरी एकटीलाच संसाराचा गाडा ओढावा लागत होता तरी माझ्यामध्ये हिम्मत भरणारा माझा फौजिच होता. तनाने हजारो मैल दूर असूनही मनाने आम्ही एकत्रच होतो. ‘लागीरं झालं जी’ या मराठी मालिकेतील शितली आणि अजिंक्य यांच्यातील संवादाप्रमाणे  "असत्याल तुम्ही तुमच्या मन मौजी, पण लाखात एक हाय माझा फौजी"  या उक्तीप्रमाणे मी भाग्यवान समजते की मी सैनिक पत्नी आहे, देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या योद्धयाची अर्धांगिनी आहे कारण सामान्य महिलांना हा प्रवास दुर्मिळच...म्हणून संसाराची गाडी एकटीनेच ओढणाऱ्या माझ्या सैनिक पत्नींचे, देशाच्या खऱ्या हिरॉइनींचे माझ्याकडून खूप अभिनंदन आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा....

सौ.जयश्री राजू मेहेत्रे (बी. ए. बी. एड)
रुई छत्रपती ता. पारनेर जि. अहमदनगर

 

Title: The soldier s wife is the real heroine of the country
प्रतिक्रिया (2)
 
एकनाथ गडकर
Posted on 9 July, 2020

जयश्री माझी क्लासमेंट आहे आणि मी तिच्या लग्नाला सुद्धा उपस्थित होतो मला तिच्या बद्दल खूप अभिमान वाटतो ती आणि तिचे फौजी मिस्टर दोघेही खूप शांत संयमी स्वभावाचे आहेत

एकनाथ गडकर
Posted on 9 July, 2020

जयश्री माझी क्लासमेंट आहे आणि मी तिच्या लग्नाला सुद्धा उपस्थित होतो मला तिच्या बद्दल खूप अभिमान वाटतो ती आणि तिचे फौजी मिस्टर दोघेही खूप शांत संयमी स्वभावाचे आहेत

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे