कोमातील युवकाने ऐकला 'तो' शब्द अन् आला शुद्धीवर
युवक अपघातात गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो कोमात गेला होता. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते.नवी दिल्लीः एक 18 वर्षीय युवक 62 दिवसांपासून कोमात होता. मात्र, चिकन हा शब्द ऐकताच तो शुद्धीवर आला. युवक शुद्धीवर आल्याचे पाहून कुटुंबियांबरोबरच डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. तैवानमध्ये ही घटना घडली आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चियू नावाचा युवक अपघातात गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो कोमात गेला होता. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते. गेल्या दोन महिन्यांपासूनच तो कोमातच होता. डॉक्टरांसह कुटुंबियांनी त्याला शुद्धीवर येण्यासाठी प्रयत्न केले. अगदी औषधोपचारांपासून प्रार्थनांपर्यंत अनेक उपाय या युवकाच्या कुटुंबियांनी केले. मात्र, तो शुद्धीवर येत नव्हता.
एक दिवस चियूचा मोठा भाऊ रुग्णालयामध्ये त्याच्या बाजूला बसून त्याच्याशी गप्पा मारत होता. गप्पा मारताना भावूक होऊन त्याला आवडणाऱ्या गोष्टींबद्दल आणि तो बरा झाल्यानंतर काय काय करायचं याबद्दल बोलत होता. त्यावेळी तो 'तुला आवडणारे चिकन फिलेट खायला जाऊ,' असे म्हणाला. चिकन शब्द ऐकताच चियूची नाडीच्या ठोक्यांची गती वाढली. चियूच्या भावाने लगेच तेथील नर्सला आवाज दिला. त्यानंतर डॉक्टरही तेथे आले. चियू शुद्धीवर आल्याचे डॉक्टरांनी त्याच्या भावाला सांगितले. चियू शुद्धीवर आल्याचे समजल्यानंतर कुटुबियांना मोठा आनंद झाला आहे.