केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

महाराष्ट्र

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून केळी उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते Jayant Patil यांनी केली आहे.

सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असून गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे नाशिक, जळगाव, धुळे, सोलापूर, पुणे, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात हजारो हेक्टरवरील केळी बागा उद्ध्वस्त झाल्या असून शेतकऱ्यांची लाखो रुपयांची गुंतवणूक एका रात्रीत मातीमोल झाली आहे.

केळी हे नगदी पीक असून रोपे, खते, औषधे, मजुरी, सिंचन आणि वाहतूक यासाठी हेक्टरी सुमारे तीन लाख रुपये खर्च येतो. अशा परिस्थितीत वादळी वाऱ्यांमुळे आणि गारपिटीमुळे केळी बागा जमीनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, असे त्यांनी नमूद केले.

शासनाने नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पारदर्शक पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी. तसेच बँक कर्जवसुलीला स्थगिती देऊन व्याजमाफीचा विचार करावा आणि विमा कंपन्यांना त्वरित विमा दावे मंजूर करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

याशिवाय, २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार मदतीचे जे निकष निश्चित करण्यात आले होते त्यांची मुदत २०२५-२६ पर्यंतच होती. त्यामुळे सद्यस्थितीत हे निकष तात्काळ सुधारित करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय शासनाने घ्यावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत