shirur-taluka-logo

गरीबीवर मात करीत त्याने केले खाकीचे स्वप्न पुर्ण…

मुलाखत

तांदळी : घरची गरीबी…पण त्याने स्वप्न मात्र मोठं पाहील… त्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी खुप मेहनत केली.दोनदा अपयश आलं,पण त्याने हार नाही मानली शेवटी त्याने आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पुर्ण केलंच म्हणतात ना “कोशिश करने वालो की हार नही होती” तांदळी (ता.शिरुर) येथील शेतकरी कुटुंबातील अविनाश रंगनाथ घोरपडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवत शिरुर तालुक्यातील युवक वर्गासमोर एक चांगला आदर्श निर्माण करुन दिला आहे.

तांदळी येथील माळवाडी चौकात अविनाश घोरपडे आपल्या कुटुंबासह राहतात.शेती जेमतेम १ एकर त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच आहे.अविनाशच्या आई अंगणवाडी मदतनीस आहेत तर वडील मजूर म्हणून दुसऱ्याच्या शेतात  काम करतात.आपल्या मुलांने उच्च शिक्षण घेऊन पोलीस उपनिरीक्षक व्हावे अशी आई-वडिलांची ईच्छा होती. अविनाशने हेच स्वप्न उराशी बाळगून प्रामाणिक कष्ट करुन स्वप्न प्रत्यक्ष सत्त्यात उतरल्याने अविनाश याच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.

अविनाशने इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.यापुर्वी अविनाशने २ वेळा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती.त्यामध्ये त्याला अपयश आले होते.परंतु निराश न होता आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविनाशने “स्वरुपवर्धिनी” या सामाजिक संस्थेत कमवा व शिका या योजनेच्या माध्यमातून  पुणे येथे राहून अभ्यास केला.अभ्यासात सातत्य ठेवल्याने अविनाशने तिस-या प्रयत्नात यश मिळवून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.या प्रवासात संतोष शिदनकर यांचे विशेष  मार्गदर्शन लाभले असल्याचे अविनाश सांगतात.

अभ्यासात सातत्य,जिद्द,चिकाटीच्या जोरावर परिस्थितीवर यशस्वीरीत्या मात करत यश मिळवले असून एवढ्यावर समाधान न मानता पुढे अभ्यास करुन डीवायएसपी होण्याची ईच्छा असून केंद्रिय लोकसेवा,राज्यसेवा व इतर स्पर्धा परीक्षा हे साध्य नसुन साधन आहे.स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्ती करायची असेल तर युवकांनी नियोजनपूर्ण अभ्यास,जिद्द, कठोर मेहनतीबरोबरच,धैर्य आवश्यक असल्याचे अविनाश घोरपडे यांनी www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले. पोलीस उपनिरीक्षकपदी यश संपादन केल्याने अविनाशचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.