खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (एसआरए) हस्तांतरित करावयाच्या प्रकल्पबाधित सदनिकांची (पीएपी) परस्पर विक्री केल्याप्रकरणी एसआरए प्राधिकरणाने गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगरमधील विकासक दत्तानी यांच्याविरोधात निष्कासनाची कारवाई सुरू केली आहे. तसेच आरे येथील रॉयल पाम प्रकल्पातील ३४९ प्रकल्पबाधित सदनिका एसआरएकडे हस्तांतरित न केल्याप्रकरणी विकासकाविरोधात आरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसआरएच्या अधिकाऱ्यांनी खासदार रवींद्र वायकर यांना ही माहिती दिली.
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील एसआरएशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार रवींद्र वायकर यांनी एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत मतदारसंघातील एकूण २७ प्रलंबित प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित प्रकल्पांतील अडचणींवर चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यात आले.
रॉयल पाम प्रकल्पातील ३४९ सदनिकांचा प्रश्न
आरे येथील रॉयल पाम प्रकल्पासाठी मेसर्स अमीर पार्क अँड अम्युझमेंट प्रायव्हेट लिमिटेड या विकासकाला २७ मार्च १९९६ रोजी आशयपत्र देण्यात आले होते. या योजनेत पुनर्वसनासाठी १२ इमारती आणि विक्री घटकासाठी १० इमारती प्रस्तावित होत्या.
पुनर्वसनाच्या १२ इमारतींपैकी सात इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे. या प्रकल्पातील ३४९ प्रकल्पबाधित सदनिकांपैकी केवळ १०४ सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. उर्वरित सदनिका अद्याप एसआरए प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत.
विक्री घटकातील १० इमारतींपैकी पाच इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले असून, उर्वरित पाच इमारतींमध्ये रहिवासी अनधिकृतपणे वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रकल्पाला अनेक वर्षे उलटूनही पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. विकासकाने ३४९ प्रकल्पबाधित सदनिका एसआरएकडे हस्तांतरित न केल्याने त्याच्याविरोधात आरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भगतसिंग नगरमधील २२९ घरांची परस्पर विक्री
गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगर पुनर्वसन प्रकल्पात विकासक दत्तानी यांनी सुमारे २२९ घरे एसआरएकडे हस्तांतरित न करता परस्पर विकल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक रहिवासी पुनर्वसनापासून वंचित राहिले आहेत. या प्रकरणी विकासकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याच्याविरोधात महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियमातील कलम १३(२) अंतर्गत निष्कासनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कोयना नगर, मयूर नगरच्या प्रश्नांवरही चर्चा
कोयना नगर प्रकल्पातील विकासकाला हटविण्यासाठी कलम १३(२) अंतर्गत प्रक्रिया सुरू असून, याबाबत सात दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. आरे येथील मयूर नगर एसआरए गृहनिर्माण इमारतींचा पुनर्विकास पुन्हा करण्यासाठी प्राधिकरणाने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून, ती मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आली आहेत.
बैठकीत जोगेश्वरी येथील शिवदर्शन, इंदिरा नगर, न्यू श्याम नगर, अलकज्योत आणि शिवनेरी गृहनिर्माण यांसह अन्य प्रकल्पांमधील प्रलंबित प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला एसआरएचे अधिकारी मिटकर, मासाळ, सूर्यवंशी, आकाश करमळकर, संध्या बावनकुळे, स्वप्ना देशपांडे, वैशाली लंभाते, विभागप्रमुख स्वप्नील टेंबवलकर, ज्ञानेश्वर सावंत, नगरसेविका वर्षा टेंबवलकर, राजुल पटेल तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…
पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…
शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…
बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…
अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…
ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…