सातारा: कोरेगाव पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने कोणतीही कल्पना न देता आमदार शशिकांत शिंदे यांच्या ल्हासुर्णे येथील निवासस्थानी बेकायदेशीररीत्या प्रवेश करून चौकशी केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यासह संबंधित कर्मचाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे.
साहिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दुपारी कोरेगाव पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. मात्र, जुजबी उत्तरे दिली जात असल्याने पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन निवेदन दिले. पक्षाचे युवा नेते साहिल शिंदे यांच्यासह तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय पिसाळ, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अरुण माने, कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲड. पांडुरंग भोसले, कोरेगाव नगरपंचायतीतील विरोधी पक्षनेते हेमंत बर्गे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रीतम बर्गे, गणेश धनवडे आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज दुपारी पोलिस अधीक्षक दोशी यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे, की कोरेगाव पोलिस ठाण्यात बुधवारी दुपारी दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या अनुषंगाने एका पोलिस कर्मचाऱ्याने बेकायदेशीररीत्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी करण्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. वास्तविक पाहता एखाद्या लोकप्रतिनिधीच्या घरी जात असताना संबंधित लोकप्रतिनिधीला त्याबाबतची कल्पना पोलिस अधिकाऱ्यांनी देणे अथवा पत्रव्यवहार करणे क्रम प्राप्त असते.
मात्र, अशी कोणतीही कल्पना न देता कोरेगाव पोलिस ठाण्याकडून असा प्रकार घडला असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून बदनामी करण्याचे षडयंत्र सुरू आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रयत्न असून, कोरेगाव पोलिस ठाण्यामध्ये एकतर्फीपणाने यंत्रणा काम करत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित पोलिस कर्मचारी एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे चौकशी करण्याचे कामकाज करत आहे. बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा सर्व प्रकार स्पष्ट दिसून येत आहे. एकूणच सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याचा प्रकार सुरू असून, संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांसह कोरेगाव पोलिस ठाण्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पोलीस ठाण्यात सोमवारी मोर्चा
दरम्यान, कोरेगाव पोलिसांकडून घडल्या प्रकाराबाबत आमदार शशिकांत शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, पोलिस यंत्रणा एखाद्या राजकीय पक्षाने दिलेल्या दिशानिर्देशाप्रमाणे काम करत असल्याचे दिसून येत आहे. त्याविरोधात पक्षाच्या वतीने सोमवारी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार असून, त्यावेळी मी स्वतः जाब विचारण्यासाठी कोरेगावात येणार आहे. संबंधितांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…