मुख्य बातम्या

शिरुर पोलिसांच्या ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ पॅटर्नचे स्वागत; कठोर कारवाईमुळे गुन्हेगारांना भरली धडकी

शिरुर (तेजस फडके): गेल्या काही महिन्यांपासून शिरुर तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गोळीबार, जीवघेणे हल्ले, टोळीयुद्ध, अवैध धंदे आणि सराईत गुन्हेगारांच्या वाढत्या हालचालींमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी आता केवळ गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी गुन्हेगारांवर आधीच वचक निर्माण करण्यासाठी राबविलेल्या नव्या ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ पॅटर्नचे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत होत आहे.

‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट’ या महाराष्ट्र पोलिसांच्या ब्रीदवाक्याला प्रत्यक्ष कृतीची जोड देण्याचा प्रयत्न शिरुर पोलिसांच्या या नव्या पॅटर्नमधून दिसून येत आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलिस ठाण्यांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर भूमिका घेतल्याने गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये धडकी भरल्याची दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी आक्रमक आणि परिणामकारक भुमिका घेतल्याने त्यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. एखादा गुन्हा करुन राजकीय किंवा आर्थिक पाठबळाच्या जोरावर मोकाट फिरता येईल, असा गैरसमज बाळगणाऱ्यांना ‘कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही आणि गुन्हेगाराला त्याच्या कृत्याची किंमत मोजावीच लागेल’. असा शिरुर पोलिसांनी स्पष्ट संदेशच दिला आहे.

शिरुर तालुक्यातील अनेक नागरिकांनी यापूर्वी पोलिसांचा धाक कमी झाल्याची भावना व्यक्त केली होती. गुन्हेगार खुलेआम फिरत असताना सामान्य नागरिक मात्र दहशतीखाली जगत असल्याचे चित्र होते. त्यामुळे आता सुरु झालेली कठोर कारवाई हि केवळ दिखाऊ किंवा तात्पुरती न राहता सातत्यपुर्ण असावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची कुंडली तयार करणे, प्रतिबंधात्मक कारवाया वाढविणे, तडीपार प्रस्तावांना गती देणे, अवैध शस्त्रांवर नियंत्रण मिळविणे आणि राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता निष्पक्ष कारवाई करणे आवश्यक आहे. गुन्हेगारांना सार्वजनिक धाक दाखविण्याबरोबरच न्यायालयीन प्रक्रियेत ठोस पुरावे सादर करून कठोर शिक्षा होईल, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.

पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल आणि पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या या नव्या पॅटर्नमुळे नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र, दोन-चार कारवायांनंतर मोहीम थंडावली, तर पुन्हा गुन्हेगारांचे मनोबल वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हि मोहीम व्यक्तीकेंद्री न राहता संपुर्ण पोलिस यंत्रणेची कायमस्वरुपी कार्यपद्धती बनली पाहिजे.

सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षिततेची हमी आणि गुन्हेगारांना कायद्याची भीती हिच खरी ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याची अंमलबजावणी ठरेल. शिरुरकरांनी पोलिसांच्या या भुमिकेचे स्वागत केले असले, तरी आता या कारवाईत सातत्य, पारदर्शकता आणि निष्पक्षता टिकविण्याची खरी कसोटी पोलिस प्रशासनासमोर आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव MIDC पोलिसांनी दुचाकी चोराला धाराशिवमधून केली अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील महागणपती पार्किंगमधून चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा छडा लावत…

40 सेकंद ago

शिक्षकांच्या सूचनांवरच घडणार शिक्षणातील बदल; ‘शिक्षण संवाद २०२६’मध्ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची ग्वाही

मुंबई : राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक गुणवत्तापूर्ण, विद्यार्थीकेंद्रित आणि परिणामकारक करण्यासाठी शिक्षकांच्या प्रत्यक्ष अनुभवांना व…

4 मिनिटे ago

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जविरोधात काँग्रेसचा भाजपावर मोर्चा; राहुल गांधींना दिलेल्या वागणुकीचा निषेध

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी; परीक्षांतील अनियमिततेवर संसदेत चर्चा आणि विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्याची मागणी मुंबई:…

9 मिनिटे ago

झुरळ विचारांची पुरळ नव्हे, विकासाचा मार्ग निवडूया

मुंबई: भारतभूमी ही केवळ भौगोलिक सीमा नसून हजारो वर्षांची संस्कृती, ज्ञान, परंपरा, संघर्ष आणि सामर्थ्याची…

15 मिनिटे ago

जन्मदिवस जयंती म्हणून साजरा करावा लागतोय’ या भावनेने कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत अश्रू

मुंबई: माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आज त्यांना भावपूर्ण…

18 मिनिटे ago

विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, ड्रग पेरण्याची धमकी; सरकारवर विजय वडेट्टीवारांचा घणाघात

पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि शेतकरी कर्जमाफीवर सरकारला धारेवर धरले; लोकशाही दडपण्याचा आरोप नागपूर: आंदोलन करणाऱ्या…

59 मिनिटे ago