महाराष्ट्र

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे. सतीश चव्हाण यांनी गेल्या १८ वर्षांपासून मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केले आहे. मराठवाड्याचा आवाज विधिमंडळात बुलंद करण्यासाठी त्यांच्या पाठीशी महायुतीची ताकद उभी करा आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ बीड येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. या सभेला पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह महायुतीचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अजितदादांनी पाहिलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी

बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर अजितदादांनी जिल्ह्याला जो विश्वास आणि आधार दिला, तेच प्रेम आणि विश्वास जपण्याची जबाबदारी आता आपल्यावर आली आहे, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. अजितदादांनी बीडच्या विकासासाठी अनेक कामे सुरू केली होती. जिल्ह्याच्या विकासाची स्वप्ने पाहिली होती आणि अनेक आश्वासने दिली होती. ही स्वप्ने पूर्ण करणे आणि दिलेले शब्द पाळणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बीड-पुणे रेल्वे सुरू करण्याचा शब्द अजितदादांनी दिला होता. त्यांच्या पश्चात हा शब्द पूर्ण करू शकलो, याचा आनंद आणि अभिमान असल्याचेही त्यांनी नमूद केले. अजितदादांची विकासाची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपली ताकद वाढली पाहिजे. त्यामुळे सतीश चव्हाण यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

१८ वर्षांचा अनुभव, विधानपरिषदेत प्रभावी कामगिरी

सतीश चव्हाण यांच्याकडे प्रदीर्घ राजकीय आणि संसदीय अनुभव आहे. अजितदादांनी २००८ मध्ये त्यांच्यावर विश्वास ठेवून पहिल्यांदा उमेदवारी दिली. त्यानंतर सलग तीन वेळा मराठवाड्यातील पदवीधर मतदारांनी त्यांना संधी दिली. गेल्या १८ वर्षांत त्यांनी पदवीधरांसह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, युवक-युवती, महिला, कष्टकरी आणि कामगारांच्या प्रश्नांना विधानपरिषदेत सातत्याने वाचा फोडली, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

गेल्या सहा वर्षांतील त्यांच्या संसदीय कामगिरीचा उल्लेख करताना त्यांनी ६७७ तारांकित प्रश्न, ९७ लक्षवेधी सूचना, अर्ध्या तासाच्या चर्चेत ५५ वेळा सहभाग आणि नियम २६० अंतर्गत प्रस्तावांमध्ये २२ वेळा सहभाग नोंदविल्याचे सांगितले. याशिवाय विविध संसदीय आयुधांचा वापर करून त्यांनी मराठवाड्यातील प्रश्न प्रभावीपणे मांडले आहेत.

लोकांचे प्रश्न समजून घेणे, ते योग्य पद्धतीने विधिमंडळात मांडणे, त्यांचा सातत्याने पाठपुरावा करणे आणि प्रश्न सुटेपर्यंत प्रयत्न करणे, हे लोकप्रतिनिधीचे महत्त्वाचे काम आहे. सतीश चव्हाण यांनी ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

शिक्षण, उद्योग आणि रोजगारनिर्मितीवर भर

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा विभागातील आठही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. मराठवाड्याने अनेक संकटांचा सामना केला असला, तरी प्रत्येक संकटावर मात करण्याची जिद्द या भूमीने दिली आहे. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार शिक्षण, कौशल्य विकास, उद्योग आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे आवश्यक आहे, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

रेल्वेचा विस्तार आणि सी-ट्रिपल-आयटीसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासाची भक्कम पायाभरणी करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

अजितदादांनी मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाला, विकासाच्या अनुशेषाला आणि तरुणांच्या भवितव्याला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांची कार्यपद्धती आणि विकासाची दूरदृष्टी पुढे घेऊन जाणे आवश्यक आहे. त्यासाठी विधानपरिषदेत मराठवाड्याचे प्रश्न ताकदीने मांडणारा अनुभवी प्रतिनिधी हवा. सतीश चव्हाण यांच्या रूपाने असा प्रतिनिधी आपल्याला मिळाला असल्याचे सांगत त्यांनी मतदारांना त्यांच्या विजयासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले.

दुष्काळाच्या संकटात शेतकरी आणि सामान्य जनतेला साथ

महाराष्ट्रासमोर सध्या दुष्काळाचे मोठे संकट उभे आहे. गेल्या महिन्यात बीड जिल्ह्यातील काही भागांचा दौरा केला असता परिस्थिती अत्यंत बिकट आणि भयावह असल्याचे पाहायला मिळाले. या भागातील नागरिकांचे प्रश्न आणि अडचणी समजून घेतल्या असून, बीडमधील दुष्काळी परिस्थितीचा आढावाही घेतला आहे, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

या संकटाच्या काळात शेतकरी आणि सामान्य माणसाला सरकार एकटे पडू देणार नाही. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या जाहीर सभेला पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार संजय दौंड, माजी आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार जयंत जाधव, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

1 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

1 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

1 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

2 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

7 तास ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

14 तास ago