मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आणि भाजपचे मानद सचिव संदीप जोशी यांनी महापालिका निवडणूक संपताच भारतीय जनता पक्षाला तडकाफडकी रामराम ठोकत सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी लिहिलेल्या भावनिक पत्रातून हा निर्णय जाहीर करत राजकारणातील वाढता संधीसाधूपणा, पक्षांतराची स्पर्धा आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणारी अस्वस्थता याकडे स्पष्टपणे बोट दाखवले आहे.
राजकारण हे पद, प्रतिष्ठा किंवा सत्तेसाठी नसून समाजसेवेचे माध्यम असावे, अशी आपली धारणा असल्याचे संदीप जोशी यांनी पत्रात नमूद केले आहे. मात्र सध्याच्या राजकीय वातावरणात मर्यादित जागा, वाढलेल्या अपेक्षा आणि सतत सुरू असलेली सत्तास्पर्धा यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थता जाणवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
५५ व्या वर्षी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय
“मी आता ५५ वर्षांचा झालो आहे. स्वतःची जागा रिक्त करून तरुण रक्ताला पुढे येऊ देणे ही काळाची गरज आहे,” असे सांगत त्यांनी पुढील राजकीय वाटचालीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडे—केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस—यांची माफी मागत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे पत्रात नमूद आहे.
१३ मेपर्यंत आमदारकीची जबाबदारी पूर्ण करणार
संदीप जोशी यांची विधान परिषदेच्या सदस्यत्वाची (आमदारकीची) मुदत १३ मे रोजी संपत आहे. ही जबाबदारी पक्षाने दिलेली असल्याने ती पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र १३ मेनंतर आमदारकीची पुनर्नियुक्ती मागणार नसून, पक्षाने दिली तरी ती नम्रपणे नाकारणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
सामाजिक व क्रीडा क्षेत्रात कार्य सुरूच राहणार
राजकारणातून निवृत्त झाल्यानंतरही सामाजिक कार्य थांबणार नसल्याचे संदीप जोशी यांनी स्पष्ट केले. करोनाच्या काळात एकल पालकत्व नशिबी आलेल्या महिलांसाठीचा ‘सोबत पालकत्व प्रकल्प’, नागपुरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ‘दीनदयाल थाळी प्रकल्प’, गोसेवा प्रकल्प, तसेच विविध आरोग्य आणि सामाजिक उपक्रम सुरूच राहणार आहेत.
यासोबतच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, बास्केटबॉल, हॉकी, कुस्ती, बॉडी बिल्डिंग संघटना आणि खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.
“नसण्यामुळे कोणाचे काही अडणार नाही, हे अंतिम सत्य”
“राजकारणात राहिलो तर पुढेही संधी मिळतील, याची मला खात्री आहे. मात्र माझ्या असण्यामुळे कुणा सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये, हे मला अधिक महत्त्वाचे वाटते. नसण्यामुळे कोणाचे काहीही अडणार नाही, हे अंतिम सत्य आहे,” असे सांगत संदीप जोशी यांनी अत्यंत शांत, संयमी आणि प्रामाणिक शब्दांत आपला निर्णय जाहीर केला आहे.
भाजपमध्ये चार वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर आणि विधान परिषदेचे सदस्य अशी विविध पदे भूषवलेल्या संदीप जोशी यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…
ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…