महाराष्ट्र

भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीचा भाजपाने घेतला धसका; मोदी-शाहांच्या सत्तेला हादरे बसत असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा दावा

मुंबई: दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीने केंद्रातील मोदी सरकारला हादरा दिला असून, या रॅलीचा धसका घेत भाजपाकडून देशभरात ‘लोकशाही बचाओ, संविधान बचाओ’ रॅलींचे आयोजन केले जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. भाजपाच्या तोंडात संविधान आणि मनात मनुस्मृती आहे. संविधान व लोकशाहीचे खरे मारेकरी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आहेत. त्यामुळे भाजपाने संविधान बचावाची भाषा करणे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असल्याचा घणाघात सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना सपकाळ म्हणाले की, गेल्या १३ वर्षांपासून केंद्रात सत्ता असूनही भाजपा आजही जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरच आरोप करण्यात व्यस्त आहे. मात्र, सत्तेच्या काळात आपण नेमके काय काम केले, याचा हिशेब देण्याचे धाडस भाजपा दाखवत नाही. २०२४ च्या निवडणुकीत मतांची चोरी करून मोदी आणि फडणवीस यांची सरकारे सत्तेत आल्याचा आरोपही त्यांनी केला. मतचोरी उघडकीस आल्याने भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, सत्ता गेल्यानंतर कारवाई होण्याच्या भीतीने सत्ताधाऱ्यांची झोप उडाली आहे, असा दावा त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सरकारकडून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सुमारे १३ कोटी नागरिकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला. मतदानाचा अधिकार हा संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला मूलभूत लोकशाही अधिकार आहे. घुसखोरांचा मुद्दा उपस्थित केला जात असला, तरी प्रत्यक्षात किती घुसखोर पकडले, याची आकडेवारी सरकारने जाहीर करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी घुसखोरांची अधिकृत आकडेवारी जनतेसमोर मांडावी; मात्र घुसखोरांच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेऊ नये, असे आव्हानही सपकाळ यांनी दिले.

लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीच्या माध्यमातून सत्तापरिवर्तन होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. राजकीय पक्षांचे अस्तित्वच सत्तापरिवर्तनासाठी असते. मग मोदी, शाह आणि फडणवीस यांना सत्तापरिवर्तनाची एवढी भीती का वाटते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

संविधानिक संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप

मोदी सरकारच्या कार्यकाळात देशातील संविधानिक संस्थांवर नियंत्रण मिळवून लोकशाही व्यवस्था कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. विद्यापीठांसह विविध संविधानिक संस्थांमध्ये संघ आणि भाजपाशी संबंधित व्यक्तींच्या नियुक्त्या करून या संस्था अप्रत्यक्षपणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.

निवडणूक आयोगाचा कारभार संशयास्पद असून सत्ताधारी पक्षाला आयोगाकडून साधी नोटीसही पाठवली जात नाही. न्यायपालिकेच्या कामकाजातही सरकारचा हस्तक्षेप वाढत असल्याचे निवृत्त न्यायाधीश उघडपणे सांगत आहेत. त्यामुळे देशातील लोकशाही संस्थांच्या स्वायत्ततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, असे सपकाळ यांनी नमूद केले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हातातील लाल कव्हरच्या संविधानावरून भाजपाकडून वारंवार टीका केली जात असल्याचा मुद्दाही सपकाळ यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांच्या हातातील पुस्तक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले भारतीय संविधान आहे. मग भाजपाला या संविधानाचा आणि लाल रंगाचा एवढा धसका का वाटतो, असा सवाल त्यांनी केला.

राहुल गांधी यांच्यावर सातत्याने टीका करूनही त्यांचा राजकीय प्रभाव वाढत असल्याने भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ‘कोण राहुल?’ असे म्हणून राहुल गांधी यांना कमी लेखण्यापासून सुरू झालेला भाजपाचा प्रवास आज मोदी-शाह यांच्या सत्तेला आव्हान देण्यापर्यंत पोहोचला आहे. भाजपाच्या पायाखालची वाळू सरकत असल्यानेच त्यांच्याकडून आकांडतांडव केले जात आहे. राहुल गांधी यांच्यावरील टीका ही भाजपाच्या वाढत्या भीतीचे प्रतीक असल्याचा दावाही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

दरम्यान, संविधान, लोकशाही आणि मतदानाचा अधिकार या मुद्द्यांवरून काँग्रेसने भाजपाविरोधातील आक्रमक भूमिका अधिक तीव्र केली असून, सपकाळ यांच्या या टीकेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध भाजपा असा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

13 तास ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

13 तास ago

शीतपित्त म्हणजे काय

शीतपित्ताच्या त्रासात अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या…

13 तास ago

अमित शाहांच्या भेटीवरून राष्ट्रवादीतील मतभेदांच्या चर्चेला उमेश पाटील यांचा खुलासा

सुनेत्रा पवारांना डावलल्याच्या बातम्या फेटाळल्या! मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयाच्या चर्चांना…

13 तास ago

इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या विकासकामांना गती द्या! चंद्रकांतदादा पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील विकासकामांना गती…

13 तास ago

पदविका विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाचा नवा अध्याय!

MSBTE कडून अत्याधुनिक ई-कंटेंट स्टुडिओ आणि संगणक केंद्राची उभारणी मुंबई.: पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या…

14 तास ago