महाराष्ट्र

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष केला पाहिजे. सत्ता येते आणि जाते; मात्र संविधानाने दिलेली मूल्ये, सामाजिक न्याय आणि बहुजनांच्या हक्कांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. संविधान हेच सामान्य माणसाच्या हक्कांचे सुरक्षा कवच असून, त्याच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने लढा उभारला पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांसाठी चिखलदरा येथे आयोजित दोन दिवसीय ‘लोकशाही मूल्यसंवर्धन अभियान’ शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या या शिबिरात लोकशाही, संविधान, सामाजिक न्याय आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांवर विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले.

संविधानवादी विचारांची चळवळ देशभर पोहोचवा

समारोपीय भाषणात वडेट्टीवार म्हणाले की, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याक या समाजघटकांना एकत्र आणून त्यांच्या प्रश्नांवर विचारमंथन करण्याचा हा उपक्रम महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातून सुरू झालेली ही वैचारिक चळवळ देशभर पोहोचली पाहिजे. शिबिरातून झालेली विचारांची पेरणी पुढील पिढीसाठी दिशादर्शक ठरेल. संविधानवादी विचार आणि सामाजिक न्यायाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारची किमान ५० शिबिरे आयोजित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

देशात विषमता आणि धर्मांधतेचे वातावरण वाढवले जात असल्याची टीका करताना त्यांनी लोकशाहीच्या बाजूने उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही दबावाला घाबरू नये, असे आवाहन केले. ज्या मूल्यांसाठी आपण काम करतो, ती मूल्ये ठामपणे मांडण्याची हिंमत कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे, असेही ते म्हणाले.

गांधी-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन

महात्मा गांधींपासून राहुल गांधींपर्यंत लोकशाही आणि जनतेच्या अधिकारांसाठी संघर्ष करण्याची परंपरा काँग्रेसने जपली आहे, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाचा मुद्दा ठामपणे मांडल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेचे समर्थन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देत ते म्हणाले की, माणसाला माणसापासून दूर करणाऱ्या विचारांना समाजाने स्वीकारता कामा नये. समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही संविधानाची मूलभूत मूल्ये असून ती केवळ भाषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष सामाजिक व्यवहारात उतरली पाहिजेत. मुलांचे भविष्य, शिक्षण, रोजगाराच्या संधी आणि संविधानाने दिलेले अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी समाजाने जागरूक राहून संघर्ष केला पाहिजे.

ओबीसींच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न उपस्थित

ओबीसी समाजाच्या राजकीय आणि प्रशासकीय प्रतिनिधित्वाचा मुद्दा उपस्थित करत वडेट्टीवार यांनी आरक्षणाच्या अंमलबजावणीतील अडचणींवर टीका केली. ओबीसी समाजाला केवळ राजकीय भाषणांतून प्रतिनिधित्व दिल्याचे सांगून चालणार नाही, तर शिक्षण, नोकरी आणि निर्णयप्रक्रियेतही न्याय्य संधी मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

२०१६ मध्ये यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ३१४ उमेदवारांच्या संदर्भातील नॉन-क्रीमी लेयरच्या अटीचा उल्लेख करत त्यांनी ओबीसी उमेदवारांच्या हक्कांबाबत प्रश्न उपस्थित केले. बहुजन समाजातील गुणवंत तरुणांना त्यांच्या गुणवत्तेनुसार संधी मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

विविध विषयांवर विचारमंथन

या दोन दिवसीय शिबिरात चंद्रकांत झटाले, निरंजन टकले, अक्षय राऊत, प्रा. निखिल रांजणकर, ॲड. सीमा तेलंगे, प्राजक्ता हनमघर, हनुमंत पवार, श्रद्धा रेखा राजेंद्र आणि प्रा. प्रवीण देशमुख यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

राष्ट्रनिर्मितीतील काँग्रेसचे योगदान, भाजपमुक्त भारताची संकल्पना, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा, देशाची आर्थिक स्थिती, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याकांचे प्रश्न, महिलांचे संवैधानिक अधिकार, राजकीय नेतृत्वातील नैतिकतेचा ऱ्हास आणि धर्मांधतेचे आव्हान या विषयांवर शिबिरात चर्चा झाली.

शिबिराच्या आयोजनासाठी माजी मंत्री वसंत पुरके यांचे वडेट्टीवार यांनी विशेष आभार मानले. लोकशाही, संविधान, सामाजिक न्याय आणि बहुजनांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी संघटितपणे काम करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार साजिद खान पठाण, ओबीसी विभागाचे अध्यक्ष यशपाल भिंगे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष अनिरुद्ध वनकर आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे उपस्थित होते.

याशिवाय अमरावती ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिरुद्ध देशमुख, अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, सकल ओबीसी संघटनेचे उमेश कोर्रम, माजी आमदार वीरेंद्र जगताप, पनवेल जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा श्रद्धा म्हात्रे, ओबीसी नेते भानुदास माळी आणि राजेंद्र राख, चिखलदरा नगराध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर, चिखलदरा काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख जहिर, श्रीकृष्ण सगणे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

2 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

2 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

2 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

3 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

3 तास ago

शिरुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…

10 तास ago