महाराष्ट्र

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली व्यथा

मुंबई: राज्यातील शेतकरी अस्मानी संकटामुळे पूर्णपणे हवालदिल झाला असून, खरीप हंगाम हातातून गेल्याने त्याच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. दसरा-दिवाळीचा सण तोंडावर असताना घरखर्च कसा भागवायचा आणि दिवाळी कशी साजरी करायची, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून मोठ्या मदतीची अपेक्षा असताना महायुती सरकारने केवळ पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. प्रचंड महागाईच्या काळात पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वाशिम जिल्ह्यातील किनवड, मालेगाव, पांडव उमरा, तांदळी आणि कामठवाडा येथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आमदार अमित झनक, वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल चौधरी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस दिलीप सरनाईक यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

७५ दिवसांहून अधिक काळ पावसाची दडी; खरीप हंगाम उद्ध्वस्त

प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, राज्यातील अनेक भागांत गेल्या ७५ दिवसांहून अधिक काळ पावसाने दडी मारली आहे. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे खरीप हंगाम पूर्णपणे कोलमडला आहे. शेतातील पिके करपली असून सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे भरलेले नाहीत. त्यामुळे उत्पादनाची आशा मावळली असून शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्नाऐवजी निराशा आली आहे. एका बाजूला पिकांचे नुकसान, तर दुसऱ्या बाजूला डोक्यावर कर्जाचा डोंगर, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

निसर्गाच्या संकटामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत असताना सरकारची भूमिका मात्र असंवेदनशील असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याच्या घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अवघ्या पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या वास्तविक गरजांच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजी असून, शेतकऱ्यांच्या दुःखाचा अपमान करणाऱ्या सरकारचा काँग्रेस निषेध करते, असेही ते म्हणाले.

हेक्टरी एक लाखांची मदत, संपूर्ण कर्जमाफीची मागणी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंज्या मदतीची खैरात नको, तर संकटातून बाहेर काढणारा ठोस आर्थिक दिलासा हवा, अशी भूमिका सपकाळ यांनी मांडली. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये सरसकट मदत देण्याबरोबरच संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

याशिवाय जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, शेतमजुरांना सानुग्रह अनुदान द्यावे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी आणि दुष्काळग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशा मागण्याही त्यांनी केल्या.

घोषणांचा फार्स बंद करा; मदत थेट खात्यात जमा करा!

दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वेक्षणे, बैठका आणि घोषणांच्या फेऱ्यांत अडकवून ठेवण्याऐवजी सरकारने प्रत्यक्ष मदत देण्यावर भर द्यावा, असे सपकाळ म्हणाले. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक आधार देण्यासाठी मदतीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यांत जमा करावी. केवळ आश्वासनांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, तर त्यासाठी ठोस निर्णय आणि तातडीच्या अंमलबजावणीची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष थांबणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरून लढा देत राहील, असा इशाराही प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…

1 तास ago

सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सुनेत्रा पवार मैदानात; महायुती एकदिलाने काम करत असल्याचा दावा

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…

2 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना करणार; एकनाथ शिंदे

शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…

2 तास ago

ग्रंथालये टिकवणे ही काळाची गरज; ग्रंथसंपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक; सचिन अहिर

मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…

2 तास ago

राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; श्रद्धा लोंढे देशात प्रथम

मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…

2 तास ago

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

5 तास ago